चौथे आगाखान यांचे निधन   

लिब्सन : शिया इस्माइली मुस्लिम समुदायाचे इमाम, राजपुत्र करीम अल हसैनी ऊर्फ आगाखान चौथे यांचे पोर्तुगालची राजधानी लिस्बन येथे नुकतेच निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. शिया इस्माइली मुस्लिम समुदायाचे ते ४९ वे इमाम होते. मुस्लिम धर्माचे संस्थापक पैगंबर मुहम्मद यांचे ते थेट वंशज होते.  लिस्बन येथे ४ फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झाल्याची माहिती आगाखान फाउंडेशनने समाज माध्यमावर एका पोस्टद्वारे दिली. 
 
इस्माइली मुस्लिम धर्मीयांचे धर्मगुरुपद त्यांना २० व्या वर्षी मिळाले होते. हॉर्वर्ड विद्यापीठातून त्यांनी पदवी संपादन केली होती. विकसनील देशांत घरे, शाळा आणि रुग्णालये उभारण्यासाठी त्यांनी अब्जावधी डॉलसची मदत केली होती. इस्माइली समुदाय प्रामुख्याने मध्य, दक्षिण आणि पश्चिम आशिया, आफ्रिकेत असून त्यांची लोकसंख्या सुमारे १२ ते १५ दशलक्ष एवढी आहे. या समुदायाचे ते धर्मगुरू होते. त्यांनी ब्रिटन आणि पोर्तुगाल देशाचे नागरिकत्व स्वीकारले होते. पोर्तुगालची राजधानी लिस्बन येथे ते राहात होते. इस्माइल समुदायाचे धर्मगुरू असूनही त्यांनी पश्चिम आशियातील युद्ध आणि शिया आणि सुन्नी समुदायातील तणावावर तीव्र चिंता व्यक्त केली होती. 

Related Articles