स्वीडनच्या शाळेतील गोळीबारात दहा ठार   

ओरेबो : स्वीडनच्या ओरेबो शहरातील एका प्रौढ शिक्षण केंद्रात मंगळवारी झालेल्या गोळीबारात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. स्वीडनच्या इतिहासात प्रथमच सामूहिक हत्याकांड झाल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. मृतांमध्ये हल्लेखोराचा देखील समावेश आहे. 
 
गोळीबारात कितीजण जखमी झाले ? याचा तपशील मिळाला नसल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान उल्फ क्रिस्टेरसन यांनी घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. निष्पापांची निर्मम हत्या करण्यात आली. क्रौर्यपूर्ण घटना, असेच तिचे वर्णन करता येईल. सामूहिक हत्याकांडाचा प्रकार असून ते का झाले? याबाबतचे प्रश्न सध्या अनुत्तरीत आहेत. त्यामुळे त्याबाबत अधिक माहिती मी देऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
 
दरम्यान, ओरेबो शहर स्टॉकहोमपासून सुमारे २०० किलोमीटरवर आहे. शहराच्या उपनगरात रिसबर्गस्का प्रौढ शिक्षण केंद्र आहे. तेथे २० वर्षांवरील विद्यार्थ्यांना प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण दिले जाते. तसेच निर्वासित, व्होकेशनल आणि बौद्धिक विकास झालेला नसलेल्यांचे वर्गही घेतले जातात. एकाने तेथे गोळीबार केला. त्यात त्याच्यासह दहा जण ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्लेखोर एकच असावा, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. गोळीबार आणि हत्येचे कारण अस्पष्ट असून तपासानंतर बाबी उघड होतील, असेही ते म्हणाले. पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता फेटाळली आहे. 

Related Articles