रॉकेल ओतून पत्नीला पेटवून देणार्‍या पतीला जन्मठेप   

पुणे : रॉकेल ओतून पत्नीला पेटवून देऊन खून करणार्‍या आरोपी पतीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा निकाल दिला. 
  
तानाजी दत्ता उर्फ दत्तात्रय सरकाळे (वय २८, रा. तांदळी, शिरूर) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. तानाजी आणि प्रियांका (वय २१) यांचा २०१३ मध्ये विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा आहे. तानाजी हा प्रियांकाच्या चारित्र्यावर सतत संशय घेऊन तिला मारहाण करायचा. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रियाकांच्या आई-वडिलांनी त्याला समजावून सांगितले होते. ७ मे २०१६ ला तानाजीने प्रियांकाशी पुन्हा वाद घालण्यास सुरुवात केली. त्याने तिच्या अंगावर रॉकेल ओतले. रॉकेल ओतल्यानंतर ती घरातून बाहेर पळाली. तानाजीने तिला पेटवून दिले. त्यानंतर तिच्या अंगावर पाणी ओतून तो फरारी झाला होता. स्टोव्ह पेटविताना पत्नी भाजली, असा बचाव त्याने केला होता.
  
गंभीर भाजलेल्या प्रियांकाला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिने मृत्यूपूर्व जबाब ससून रुग्णालयात दिला होता. उपचारादरम्यान तिचा ११ मे ला मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी केला. आरोपी तानाजीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी आठ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. साक्ष, तसेच पुरावे ग्राह्य धरून आरोपीला न्यायालयाने जन्मठेप आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Related Articles