महापालिकेच्या जलतरण तलावांमध्ये बसवणार युव्ही फिल्टर यंत्रणा   

पुणे : महापालिकेने शहरातील नागरिकांसाठी विविध ठिकाणी जलतरण तलाव बांधले आहेत. या तलावातील पाण्याचे शुध्दीकरणासाठी मोठ्या प्रमाणात क्लोरीनचा वापर केला जातो. मात्र या क्लोरीनच्या अतिवापरामुळे अनेकांना त्वचेचे, तसेच श्वसनाचे आजार होत असल्याने आरोग्य धोक्यात येते. आरोग्याच्या तक्रारी दूर व्हाव्यात यासाठी जलतरण तलावांमध्ये युव्ही फिल्टर बसविले जाणार आहेत. या फिल्टरसाठी ८ ते १० लाखांचा खर्च अपेक्षित आहे.
 
उन्हाळ्यामध्ये शाळांना सु्ट्ट्या लागल्यामुळे अनेक शालेय विद्यार्थी जलतरण तलावात जात असतात. नागरिकांकडून देखिल जलतरण तलावात पोहण्याचा आनंद लुटला जातो. जलतरण तलावात पोहल्यानंतर आरोग्याच्या तक्रारी जाणवू नये, म्हणून पाण्याच्या शुध्दीकरणासाठी युव्ही फिल्टर बसविण्यात येणार आहेत. एक फिल्टर तीन ते चार वर्षांपर्यंत कार्यरत राहतो. देशभरात मोठ्या पंचतारांकरीत हॉटेलमध्ये अशा प्रकारचे फिल्टर बसविण्यात येतात. हे फिल्टर आमदार निधीतून बसविण्यात येणार असून कोथरूड मतदारसंघातील चार तर शिवाजीनगर मतदारसंघात एका तलावात हा फिल्टर बसविण्यास महापालिकेच्या एस्टीमेट कमिटीच्या बैठकीत नुकतीच मान्यता देण्यात आली. अशा प्रकारे फिल्टर बसविणारी पुणे ही राज्यातील पहिली महापालिका ठरणार असल्याची माहिती विद्युत विभागाच्या प्रमुख मनिषा शेकटकर यांनी दिली. महापालिकेचे शहरात २५ हून अधिक जलतरण तलाव असून ते ठेकेदारांच्या माध्यमातून चालविले जातात. या ठिकाणी पाण्याचे शुध्दीकरण करण्यासाठी क्लोरीनचा वापर केला जातो. 
 
महापालिकेकडून पिण्याच्या पाण्यासाठी क्लोरीनची मात्रा २ पीपीएम (क्लोरिन पार्टस् पर मिलियन) तर जलतरण तलावासाठी ३ पीपीएम असणे आवश्यक आहे. मात्र, ठेकेदारांकडून पाणी शुध्द करण्यासाठी त्या पेक्षा अधिक वापरले जाते. तसेच त्याचे कोणतेही मोजमाप ठेवले जात नाही. परिणामी, जादा क्लोरीन वापराने नागरिकांना त्वचा तसेच श्वसन विकार आणि इतर आजारांचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत पाणी शुध्द करण्याचा पर्याय म्हणून आता जलतरण तलावांसाठी अल्ट्राव्हायलेट किरणांचा मारा करून पाणी शुध्द करणारी यंत्रणा उपलब्ध आहे. ती वापरली जाणार आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील आणि शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी आमदार निधी उपलब्ध करून दिला असून त्यातून हा निधी देण्यात आला आहे. त्यातून ही यंत्रणा उभारली जाणार आहे.

Related Articles