नेताजींचे सहकारी - अबद खान   

गाऊ त्यांना आरती ,शिरीष चिटणीस (कार्यवाह, महाराष्ट्र साहित्य परिषद)

’द ग्रेट एस्केप’ ऑफ नेताजी सुभाषचंद्र बोस ही ब्रिटिश सत्तेला चोख उत्तर दिली गेलेली आणि प्रचंड झोंबलेली अशी ऐतिहासिक घटना आहे. ’द ग्रेट एस्केप’ नावाचे शिशिरकुमार बोस यांनी १९७५ मध्ये लिहिलेले इंग्रजीतील पुस्तक अजूनही ’बेस्ट सेलर’ म्हणून ओळखले जाते. कोलकात्यामधून ब्रिटिश सत्तेच्या नजरकैदेत असलेले, प्रचंड पहारा असलेले नेताजी १७ जानेवारी १९४१ रोजी पहाटे शिशिरकुमार बोस या आपल्या पुतण्याच्या सहकार्याने पसार झाले. २६ जानेवारी १९४१ रोजी बोस कुटुंबीयांनीच नेताजी घरात नाहीत असे जाहीर केले आणि ब्रिटिश शासनाचे धाबे दणाणले. त्यांनी भारतभर नेताजींचा शोध घेतला; पण ते सापडले नाहीत. तोपर्यंत त्यांनी भारत देश सोडून अफगाणिस्तानमधील काबूल गाठले होते. या त्यांच्या सुटकेच्या मोहिमेमध्ये त्यांना मदत करणारे आणि पेशावरमध्ये ज्यांच्या घरी २० जानेवारी ते २५ जानेवारी १९४१ असे सहा दिवस राहिले, त्या स्वातंत्र्यवीर अबद खान यांना एप्रिल १९४१ मध्ये अटक करण्यात आली. नेताजींच्या सुटकेमध्ये हात असलेल्या आघाडी प्रांतातल्या लोकांपैकी सर्वांत जास्त त्रास अबद खान यांना झाला. लाहोर किल्ल्यावरच्या तुरुंगात अबद खान यांचा अतोनात छळ करण्यात आला. सन १९४५ पर्यंत म्हणजे दुसरे महायुद्ध संपेपर्यंत अबद खान यांची पंजाबातल्या कैदेतून सुटका झाली नाही. सन २००५ मध्ये शिशिरकुमार बोस यांच्या पत्नी खासदार कृष्णा बोस यांनी पेशावरमधल्या जहांगीरपुरा भागातल्या अबद खान यांच्या घराला भेट दिली. ज्या घरात नेताजी यांनी अबद खान आणि त्यांच्या कुटुंबीयांबरोबर सहा दिवस आनंदाने काढले त्याच घरात कृष्णा बोस यांनी सर्व पाहणी केली. 
 
स्वातंत्र्यलढ्यात भूमीगत कार्य
 
पेशावर ते काबूल या प्रवासासाठी तसेच पेशावर येथे मुक्काम कोठे करावा यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी १९४० मध्ये डिसेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात केव्हातरी आपले स्वातंत्र्यलढ्यातील सहकारी अकबर शाह यांना कोलकात्यावरून त्यांच्या गावात म्हणजेच पेशावरजवळील बद्राशीला तार केली होती. त्यात लिहिले होते ’रिच कोलकाता बोस’. तातडीने काहीतरी बोलायचे असल्याशिवाय नेताजी आपल्याला असे बोलावून घेणार नाहीत हे शाह यांना ठाऊक होते. त्यांनी ताबडतोब फ्रंटियर मेल पकडली आणि ते कोलकात्याला आले. अकबर शाह ३८/२ एल्जिन रस्त्यावरच्या नेताजी यांच्या घरी पोहोचले तेव्हा नेताजींचे सचिव अमूल्य मुखर्जी यांनी त्यांचे स्वागत केले. नेताजींनी अकबर शाह यांना सांगितले की, मी उपोषण सुरू केले. तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी तेवढाच एक मार्ग होता. ब्रिटिश सरकारला नेताजींनी सांगितले होते की, ’मला सोडा नाहीतर मला जगायची इच्छा नाही.’ भारत सोडायचा आणि ब्रिटिश साम्राज्यवादाला विरोध करणार्‍या सोव्हिएत युनियनसारख्या देशांच्या नेत्यांशी संपर्क साधायचा, त्यांच्याकडे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मदत मागायची, अशी नेताजींनी मनाची तयारी केली होती. अकबर शाहने आपल्याला भारताची वायव्य आघाडी ओलांडायला आणि पुढे अफगाणिस्तानची राजधानी काबूल इथल्या आदिवासी भागातून प्रवास करायला मदत करावी, अशी त्यांची इच्छा त्यांनी त्यांना सांगितली होती. नेताजी यांनी अकबर शाह यांची आपला २० वर्षांचा पुतण्या शिशिरकुमार बोस यांच्याशी त्यांचा संवादही घडवून आणला होता. १७ जानेवारी १९४१ रोजी पहाटे दीड वाजता शिशिरकुमार बोस यांनी ३८/२ एल्जिन रस्त्यावरच्या आपल्या वडिलोपार्जित घरातून आपल्या काकांना गाडीतून गोमोह रेल्वे स्थानकावर सोडले. जानेवारी १९४१ मध्ये कोलकात्यातून निसटण्याच्या मोहिमेत कोलकात्याची बाजू लावून धरण्यासाठी नेताजींचा मुख्य भरवसा शिशिरवर होता. पेशावरची जबाबदारी मात्र त्यांनी अकबर शाह यांच्यावर मोठ्या विश्वासाने सोपवली होती. नेताजींच्या घरी नेताजी, शिशिरकुमार बोस, अकबर शाह यांनी एकमेकांच्या समन्वयाने भारतातून सुटण्याची योजना आखली. शिशिरकुमार बोस यांनी नेताजींच्या वतीने १९४१ ते १९४४ पर्यंत धाडसाने स्वातंत्र्यलढ्यातील भूमिगत कार्य केले. या कार्यामुळेच सुरुवातीला काही काळ दिल्लीच्या लाल किल्ल्यात आणि नंतर दीर्घकाळ लाहोरच्या किल्ल्यात शिशिरकुमार बोस यांना शिक्षा भोगावी लागली. 
 
संस्मरणीय भेट
 
अकबर शाह पेशावरमध्ये असल्याने आणि पेशावर पाकिस्तानमध्ये गेल्याने शिशिरकुमार यांचा १९४१ नंतर त्यांच्याशी संपर्कच नव्हता. अकबर शाह जिवंत असून ते बद्राशी गावातच राहतात हे १९७० च्या दशकात नेताजी रिसर्च ब्युरोला समजले; पण पाकिस्तानने त्यांना भारतात येण्यास परवानगी दिली नाही. शिशिरकुमार बोस यांची गाठ जून १९८३ मध्ये कोलकात्यातल्या त्यांच्या गुप्तभेटीनंतर बेचाळीस वर्षांनी अकबर शाह यांच्याशी इंग्लंडमध्ये पडली. अकबर शाह यांचा मुलगा इंग्लंडमध्ये होता. त्याच्याकडे अकबर शाह मेडिकल ट्रीटमेंटसाठी आले होते. ही माहिती शिशिरकुमार यांना समजल्यावर त्यांच्याशी त्यांनी संपर्क केला. या संस्मरणीय भेटीत शिशिरकुमार यांच्याबरोबर त्यांची पत्नी कृष्णा बोस याही होत्या. या भेटीत अकबर शाह यांनी शिशिर आणि कृष्णाला नेताजींच्या पेशावरमधल्या १९ जानेवारी १९४१ ते २६ जानेवारी १९४१ एक आठवड्याच्या वास्तव्याविषयी प्रत्येक तपशील सांगितला. शिशिरकुमार बोस यांनी १९७५ मध्ये महानिष्क्रमण या बंगाली पुस्तकातून नेताजींची कारकीर्द मांडली आहे. शिशिर आणि कृष्णा बोस यांची १९८३ मध्ये इंग्लंडमध्ये अकबर शाह यांच्याशी भेट झाल्यानंतर शाह यांनी आपण तोंडी सांगितलेला सर्व वृत्तान्त लेखी स्वरूपात ’नेताजी रीसर्च ब्युरो’कडे दिला. त्याचा समावेश ’द ग्रेट एस्केप’च्या तिसर्‍या आवृत्तीपासून जी २००० मध्ये प्रकाशित झाली, यामध्ये ’नेताजीज एस्केप : अन अनटोल्ड चॅप्टर’ या नावाने परिशिष्ट म्हणून जोडण्यात आला.
 
१९ जानेवारी १९४१ रोजी पेशावरला पोहोचलेल्या नेताजींना २६ जानेवारी १९४१ रोजी भगत राम तलवार आणि वाटाड्या यांच्याबरोबर महमंद शाह यांनी गाडीने जामरूद गाव आणि खजुरी मैदान या पेशावरच्या पश्चिम आणि खैबर खिंडीच्या दक्षिण भागातून आफ्रिकी आदिवासी प्रदेशाच्या सीमेपर्यंत सोडले. परत येऊन ते बद्राशी गावात अकबर शाह यांना भेटले. एप्रिल १९४१ मध्ये या मोहिमेसाठी मदत करणार्‍या अकबर शाह, महमंद शाह आणि अबद खान यांना एकाच दिवशी ब्रिटिश पोलिसांनी अटक केली. तिघांनाही अटक करून तुरुंगात ठेवल्याचे एकमेकांना माहीतही नव्हते. तिघांनीही कैद सोसली; पण कोणतीही माहिती ब्रिटिश शासनाला दिली नाही. ही सर्व माहिती शिशिरकुमार बोस यांनाही १९ जून १९८३ मध्ये समजली. १९ जानेवारी १९४१ रोजी संध्याकाळी नेहमीप्रमाणे फ्रंटियर मेल पेशावरला आली. अकबर शाह बाहेर जाण्याच्या फाटकापाशी वाट बघत होते. त्यांनी लांब काळा कोट घातलेले नेताजी बोस यांना ओळखले आणि त्यांना ताजमहाल हॉटेलमध्ये मुक्कामास नेले. झियाऊद्दीन नाव धारण केलेले नेताजी काबूलला जायला निघण्यापूर्वी अकबर शाह यांनी त्यांची व्यवस्था काही दिवस एका मित्राच्या घरी करण्याचे योजले होते. अकबर शाह नेताजींच्या सुखसोयींचा आणि आरामाचा विचार करत होते. या मित्राच्या घरी जात असताना पुसा रव्वानी बझार इथे अकबर शाह यांची गाठ अबद खान यांच्याशी पडली. अबद खान हे शाह यांचे विश्वासू सहकारी आणि पेशावर जिल्ह्यातले ’फॉरवर्ड ब्लॉक’चे वरिष्ठ कार्यकर्ते होते. अबद खान यांना दीर्घ राजकीय पार्श्वभूमी होती. पेशावरहून काबूलला जाताना नेताजींना सोबत करण्यासाठी अकबर शाह यांनी मनातल्या मनात ज्या तीन लोकांची निवड केली त्यापैकी अबद खान एक होते. अबद खान म्हणाले, नेताजी यांना हॉटेलात अथवा कोणाच्याही घरी न ठेवता माझ्याच घरी आणा. सामान्य, गरीब पठाण कसे राहतात याचा अनुभव घेतला तर नेताजींसाठी तो फार उपयुक्त ठरेल. ते पुढे असेही म्हणाले, की, पुढच्या प्रवासात उपयोगी ठराव्या यासाठी पठाणांच्या चालीरीती, सवयी, रिवाज याविषयी आपण स्वतः नेताजींना माहिती देऊ. त्यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे २० जानेवारी १९४१ रोजी तांबड फुटण्याआधीच अबद खान आणि अकबर शाह दोघेजण ताजमहाल हॉटेलात गेले आणि नेताजींना अबद खानच्या साध्यासुध्या घरी घेऊन आले. घरात शिरल्यावर नेताजींना दोन चारपाया दिसल्या. नेताजी त्यातल्या एका चारपाईवर बसले आणि त्यांनी पाणी मागितले. अकबर शाह यांनी कुजबुजत्या आवाजात पश्तू भाषेत अबद खानना स्वच्छ काचेच्या भांड्यात पाणी आणायला सांगितले. यावर अबद खान खो खो हसत सुटले. नेतोजींनी ’काय झालं’? अस विचारले. अबद खान यांनी त्यांना सांगितले, की आता इथून पुढे तुम्ही काचेच्या पेल्यातून पाणी न पिता कंडोलीमधून पाणी प्यायची सवय करायला हवी. पठाण लोक पाणी पिण्यासाठी जे मातीचे भांड वापरतात त्याला ’कंडोली’ म्हणतात.
 
आदिवासींच्या चालीरीती
 
अबद खान कंडोलीमध्ये प्यायचे पाणी घेऊन आले. सुभाषचंद्र बोस यांना त्यातून पाणी पिताना बघून खान आणि शाह दोघेही असहाय्यपणे हसू लागले. अबद खान नेताजींना म्हणाले, तुमच्या पुढच्या काबूलपर्यंतच्या प्रवासात एखाद्या आदिवासी जमातीतला माणूस आपल्याकडच्या कंडोलीतून थोडे पाणी पिऊन झाल्यावर त्यातलेच उरलेले पाणी तुम्हाला देऊ शकेल असं झालं तर, नेताजींनी जराही न संकोचता त्या माणसाची कंडोली घेऊन उरलेले पाणी पिऊन टाकले पाहिजे असेही अबद खान म्हणाले. पठाणांच्या चालीरीतीविषयीची ’नेताजींच्या शिक्षणाची ही सुरुवात होती. २० ते २५ जानेवारी १९४१ रोजी सहा दिवस नेताजी अबद खान यांच्या घरी आनंदाने राहिले. ’अबद खान आणि नेताजींची खूप चांगली दोस्ती झाली होती. नेताजींनी पठाणांच्या विविध चालीरीती आणि वागण्याच्या पद्धती शिकून घेतल्या. आदिवासी भागात असताना मशिदीत जाऊन प्रार्थना कशी म्हणायची याच्याही सूचना अबीद खान यांनी नेताजींना दिल्या’.
 
अबद खान यांना खरे तर नेताजींबरोबर काबूलला जायचे होते; पण काबूलमध्ये इतर कामासाठी आणि दूतावास अधिकारी व्यक्तींशी संवाद साधण्यासाठी दुसर्‍या व्यक्तीची जरूरी असल्याने अबद खान यांना पेशावरलाच थांबावे लागले. दरम्यान अकबर थाह यांनी करड्या रंगाचे जाडंभरडं कापड आणून नेताजींसाठी एका शिंप्याकडून लांब शर्ट, ढगळ तुमान आणि पागोटे तयार करून घेतले. नेताजींनी ते कपडे घालून बघितले तेव्हा ते अगदी एखाद्या आदिवासी पठाणासारखे दिसत होते. सुभाषचंद्र बोस यांनी अबद खानचे पेशावरमधले घर सोडले. अबद खान यांनी त्यांच्यासाठी एका कारची व्यवस्था केली होती. नेताजींच्या सोबतीला महंमद शाह, भगत राम तलवार आणि अबद खान यांनी दिलेला वाटाड्या होता. हा सर्व ऐतिहासिक मजकूर १९४१ मध्ये नेताजी पेशावराला पोहोचल्यापासून ते तिथून बाहेर पडेपर्यंत काय काय घडले जो अज्ञात होता तो इंग्लंडमधल्या वॉलसॉल या गावात ८५ वर्षांच्या अकबर शाह यांच्याकडून १९८३ मध्ये शिशिरकुमार बोस आणि कृष्णा बोस यांना ध्वनिमुद्रणात मिळाला. बेचाळीस वर्षांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पलायनासाठी जीवाचे रान करणारे शिशिरकुमार बोस आणि अकबर शाह एकमेकांना भेटले. अकबर शाह यांच्या हकीकतीमुळे १९४१ मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी भारतातून पलायन करून घेतलेल्या विलक्षण सुटकेची कहाणी पूर्ण झाली. अबद खानसारख्या स्वातंत्र्यसैनिकाची कहाणी आपला धगधगता स्वातंत्र्यलढा अधोरेखित करते.

Related Articles