महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकार अपयशी : दानवे   

मुंबई, (प्रतिनिधी) : राज्यातील बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारांच्या आत्महत्या, महागाई, कायदा व सुव्यवस्था अशा विविध मुद्यांवर सरकारला प्रचंड अपयश आले आहे. हे अपयश लपवण्यासाठी महायुती सरकार राज्यात धार्मिक तेढ निर्माण करीत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी संयुक्त पत्रकार परिषदेत केला. विधिमंडळाच्या अंदाजपत्रकी अधिवेशाचे सूप वाजल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू, आमदार सचिन अहिर, आमदार सुनील शिंदे तसेच शिवसेनेचे गट नेते भास्कर जाधव, काँग्रेसचे नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.
 
विधानसभा निवडणुकांपूर्वी सरकारने शेतकर्‍यांना संपूर्ण कर्ज माफी आणि लाडक्या बहिणींनी २१०० रुपये देण्याची घोषणा केली होती. पण, सरकारने यापैकी कोणत्याही घोषणांची पूर्तता या अधिवेशात केली नाही. शेतकरी व लाडक्या बहिणींच्या तोंडाला सरकारने पाने पुसली आहेत.  सरकारने या अधिवेशात विरोधकांचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न केला; पण तरीही आम्ही अधिवेशात सामान्य जनतेचा आवाज उठवला, असे भास्कर जाधव म्हणाले. विरोधी पक्ष नेता निवडण्यासाठी संख्याबळाची अट नाही; पण, तरीही या सरकारने विरोधी पक्ष नेत्याची निवड केली नाही, अशी खंत भास्कर जाधव यांनी व्यक्त केली. 
 

Related Articles