रोजंदारी कामगारांचे टपाल कार्यालयासमोर आंदोलन   

बंडगार्डन : अखिल भारतीय डाक आऊटसोर्स एम्प्लॉईज युनियनच्या वतीने रोजंदारीवर काम करणार्‍या कामगारांचे विविध मागण्यांसाठी पुणे विभागीय कार्यालया समोर पुणे टपाल खात्याच्या अधिकार्‍यांच्या विरोधात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
 
पुणे विभाग टपाल कार्यालयात गेल्या दहा वर्षांपासून रोजंदार व आऊटसोर्स म्हणून काम करणार्‍या कामगारांना पीएफ (प्रॉव्हिडंट फंड) चा लाभ मिळत नव्हता. यासाठी काही कामागर संघटनेच्या माध्यमातून न्यायलयात गेले. या ठिकाणी न्यायलयाने कामगारांच्या बाजूने न्याय दिला. मात्र टपाल खात्याचे अधिकारी या कामगारांचा मानसिक छळ करत आहेत. शिवाय जाणुनबुजून कामापासून सर्व कामगारांना वचित ठेण्यात आले आहे. त्यांची कोंडी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. 
 
सर्व कामगारांना गेल्या दहा वर्षांपासून फंड दिला नसल्याने न्यायाधीकरण प्रॉव्हिडंट फंडच्या समोर हे प्रकरण ठेवले असता सर्व कामगारांना असे कामापासून वंचित ठेवल्यास त्यांची गंभीर दखल घेऊ असे सुनवणी दरम्यान अधिकार्‍यांना सांगण्यात आले. मात्र अधिकार्‍यांनी हा आदेश डावलून अजून कामगारांना कामापासून वंचित ठेवले आहे.यामुळे राज्यातील सर्व कामगार आक्रमक होऊन न्याय मागण्यासाठी विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू ठेवले असल्याची माहिती कामगार यशवंत चौधरी यांनी दिली.
 
सर्व कामागारांना कामावर तत्काळ पुन्हा घेऊन त्यांचा गेल्या दहा वर्षांपासून राहिलेला फंड द्यावा अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढेल असा इशारा युनियनच्या पदाधिकार्‍यांनी दिला आहे. याचे  निवेदन पोस्ट जनरल कार्यालयाच्या अधिकार्‍यांना देण्यात आले आहे. संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मोटे, उपाध्यक्ष वसंत पवार, सल्लगार अजित अभ्यंकर, नितीन पाटील, मोहन पोटे, सिद्धार्थ सोनकांबळे, प्राजक्ता वाघमारे, मोनाली पंचमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
 
प्रॉव्हिडंट फंड अधिकार्‍यांचा आदेश डावलून कामगारांना कामापासून वंचित  ठेवले आहे. शिवाय गेल्या दहा वर्षांत फंड मिळावा म्हणून कामगारांना टपाल खात्यांनी सभासद केले नाही. हे प्रॉव्हिडंट फंड अधिकार्‍यांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. कामगारांना तत्काळ कामावर घेणे आवश्यक आहे. अन्यथा टपाल खात्यातील अधिकार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल होईल व आंदोलनाची तीव्रता राज्यभर वाढेल.
 
- अजित अभ्यंकर, कामगार नेते
 

Related Articles