न्यूझीलंडचा मालिका विजय   

वेलिंगटन : न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील ५ सामन्यांची टी २० मालिका पार पडली आहे. न्यूझीलंडने पाचव्या सामन्यात देखील  पाकिस्तानला सहजपणे पराभूत केले. न्यूझीलंडने पाचव्या टी २० मध्ये पाकिस्तानवर ८ फलंदाज  राखुन विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडने मालिका ४-१ अशी जिंकली. पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना १२८ धावा केल्या होत्या. ही धावसंख्या न्यूझीलंडने  केवळ १० षटकामध्येच पार केली. 
 
पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना १२८ धावा केल्या होत्या. पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगाने सर्वाधिक धावा केल्या. सलमान अली आगाने ३९ चेंडूवर ५१ धावा केल्या. यामध्ये त्याने ६ चौकार आणि १ षटकार मारला. तर, शादाब खान याने २०  चेंडूवर २८ धावा केल्या. तर, पाकिस्तानचे इतर फलंदाज अपयशी ठरले. पाकिस्तानचे ८ फलंदाज दोन अंकी धावा करु शकले नाहीत. आज देखील पाकिस्तानचा संघ देखील मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरला. 
 
न्यूझीलंडने पाकिस्तानने दिलेले आव्हान सहजपणे पार केले. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली. सलामीवीर टिम सिफर्ट आणि फिन एलन यांनी ६.२ षटकामध्येच ९३ धावांपर्यंत मजल मारली होती. फिल एलन याने १२ चेंडूवर २७ धावा केल्या. तर, टिम सिफर्ट याने पाकिस्तानच्या गोलंदाजींची धुलाई केली.  त्याने ३८ चेंडूमध्ये ९७ धावा केल्या. त्याने त्याच्या डावात ६ चौकार अन् १० षटकार मारले. पाकिस्तानकडून दोन बळी सुफियान मुकीम याने घेतल्या. 
 
न्यूझीलंडचा गोलंदाज जिम्मी नीशम याने पाकिस्तानच्या फलंदाजांना सळो की पळो करुन सोडले. जिम्मी नीशम याने ४  षटकांमध्ये २२ धावा देत ५ बळी घेतल्या. जॅकब डफी याने २ बळी घेतल्या. बेन सियर्स आणि ईश सोधी यानं १-१ बळी घेतल्या. पाकिस्तानच्या पराभवाची मालिका सुरुच आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमधून पाकिस्तान पहिल्या फेरीतच बाहेर पडल्याचे दिसून आले. त्यानंतर टी २० मालिकेत देखील पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागल्याचे पाहायला मिळाले.
 
दरम्यान, यानंतर पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात ३ एकदिवसाच्या सामन्यांची मालिका होणार आहे.  त्यात पाकिस्तान कशी कामगिरी करणार ते लवकरच पाहायला मिळेल. गेल्या काही काळापासून पाकिस्तानच्या संघाची कामगिरी निराशाजनक होत असल्याचे दिसून येते. चॅम्पियन्स चषकाचे आयोजन करुन देखील पाकिस्तानला त्या स्पर्धेत चांगली कामगिरी करता आली नव्हती. 
 

Related Articles