सोने-चांदी सतत लकाकताहेत   

वृत्तवेध

भारतात सोने आणि चांदीच्या दरात नववर्षात मोठी वाढ झाली आहे. राजधानी नवी दिल्लीत एक तोळा सोन्याचे दर अलिकडेच ९० हजार ७५० रुपये झाले तर चांदीचा भाव एक लाख दोन हजार ५०० रुपयांवर पोहोचला. नववर्षात म्हणजेच १ जानेवारी २०२५ पासून  १७ मार्चपर्यंतचा विचार केल्यास सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. नववर्षात सोने ११ हजार ३६० रुपयाने महागले आहे.
 
१ जानेवारीला दहा ग्रॅम सोन्याचा दर ७९ हजार ३९० रुपये इतका होता. १७ मार्च रोजी सोन्याचा दर ९० हजार ७५० रुपये होता. म्हणजेच या काळात सोन्याचा दर ११ हजार ३६० रुपयांनी वाढला आहे. सोन्याच्या दरात अडीच महिन्यात १४.३१ टक्के वाढ झाली आहे. अखिल भारतीय सराफा संघाच्या माहितीनुसार अलिकडेच सलग चार दिवस सोन्याच्या दरात वाढ झाली. चांदीच्या दरातदेखील अशीच १३०० रुपयांची वाढ झाली आणि हे दर एक लाख दोन हजार पाचशे रुपयांवर पोहोचले. केंद्रीय बँकांकडून करण्यात येत असलेली सोन्याची खरेदी आणि जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे.
 
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसर्‍यांदा कार्यभार स्वीकारल्यानंतर जागतिक बाजारातील अस्थिरता वाढली आहे. जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरण पहायला मिळाली आहे. शेअर बाजारातील घसरणीमुळे आणि अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांमध्ये सुरक्षित पर्याय म्हणून सोने-खरेदीला प्राधान्य देण्याचा ट्रेंड वाढला. यामुळे गुंतवणूकदारांनी सोनेखरेदीला प्राधान्य दिले. नववर्षात सोन्याच्या दरात ११ हजार ३६० रुपयांची वाढ झाली असल्यामुळे गुंतवणूकदारांना त्यात गुंतवणूक करावी, असे वाटू शकते. सोन्यातील गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय घेण्यापूर्वी काही आकडेवारी पाहिली पाहिजे. सोन्याने गेल्या तीन वर्षांमध्ये १७ टक्के परतावा दिला आहे, तर सेन्सेक्सने ११ टक्के परतावा दिला आहे.

Related Articles