युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा पूर्णपणे थांबवावा   

पुतिन यांची आणखीन एक मागणी

मास्को : रशिया-युक्रेनमध्ये गेल्या काही महिन्यापासून युद्ध सुरू आहे. या दोन देशातील युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. पण रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या मागण्यांची यादी संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. पुतिन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रस्तावित युद्धबंदी योजनेत आणखी एक अट जोडली आहे. युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा पूर्णपणे थांबवावा, अशी मागणी पुतिन यांनी केली आहे. या मागणीमुळे युरोप आणि अमेरिकेसाठी नवीन समस्या निर्माण झाल्या आहेत. 
 
युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा पूर्णपणे बंद झाल्यावरच रशिया युद्धबंदीला सहमती देईल, असे डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांच्यात मंगळवारी झालेल्या फोन संभाषणापूर्वी, क्रेमलिन यांनी स्पष्ट केले.पुतिन यांनी शांतता करारासाठी ही एक महत्त्वाची अट घातली आहे. युरोपने यावर गंभीर आक्षेप व्यक्त केला आहे. एका वरिष्ठ युरोपीय अधिकार्‍याने सांगितले की, जर ही अट मान्य केली तर रशिया युद्धबंदीच्या आडून आपले सैन्य पुन्हा एकत्र करू शकेल, तर युक्रेन कमकुवत होईल. अमेरिकेकडून युक्रेनला मिळणारी किमान लष्करी मदत तरी थांबवावी ही रशियाची मागणी आहे. ब्रिटन आणि युरोपियन युनियन युक्रेनला नवीन शस्त्रास्त्रे पुरवण्यावर काम करत आहेत. पाश्चात्य देश रशियाची ही मागणी सहजासहजी मान्य करण्याच्या मनःस्थितीत नाहीत. 
 
गेल्या आठवड्यात, सौदी अरेबियामध्ये झालेल्या चर्चेनंतर अमेरिका आणि युक्रेनने ३० दिवसांच्या युद्धबंदीचा प्रस्ताव दिला. ट्रम्प प्रशासनाने युक्रेनवर दबाव आणण्यासाठी शस्त्रास्त्रांचा पुरवठा आणि गुप्तचर माहितीच्या देवाण-घेवाणीवर तात्पुरती बंदी घातली होती, ती बंदी आता उठवण्यात आली आहे.
 
रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प व्लादिमीर पुतिन यांना भेटण्यास तयार आहेत. या संभाषणाचा मुख्य उद्देश युद्ध थांबवणे आहे, परंतु त्यामागे अनेक अटी आहेत. या करारात, रशियाला युक्रेनला नाटोपासून दूर ठेवायचे आहे आणि त्यांची लष्करी आणि शस्त्रास्त्र क्षमता मर्यादित करायची आहे. या प्रस्तावामुळे युरोपमध्ये चिंता निर्माण झाली आहे. जर हा करार झाला तर युक्रेन भविष्यात नवीन रशियन हल्ल्यासाठी आणखी असुरक्षित होईल. 
 

Related Articles