विवाह समस्या... ज्वलंत प्रश्न   

माझेही मत, शांताराम वाघ 
 
आजकाल विवाह जमविणे हा एक मोठा जटिल प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षणाचा वाढता प्रसार यामुळे मुलाबरोबर मुलीसुद्धा मोठ्या प्रमाणात शिक्षित होत आहेत, ही अतिशय चांगली घटना आहे. आजही अगदी खेड्यापाड्यात सुद्धा मुली कमीत कमी पदवीधर झालेल्या दिसतात व साहजिकच त्यांची अपेक्षा नोकरीची असते. त्यांना संगणक किंवा इतर क्षेत्रात नोकर्‍या मिळतात. त्यामुळे त्यांच्या विवाहासंबंधी अपेक्षा उंचावल्या आहेत. जोडीदार मिळवता असावा, त्याचे स्वतःचे घर असावे व ते पुण्यासारख्या शहरात हवे. त्यास पगार वधूपेक्षा जास्त असावा. इथपर्यंत अपेक्षा ठीक आहेत; पण घरात मुलाशिवाय कोणीही नको. आता मुलाच्या आई-वडिलांनी कोठे जावयाचे?
 
लग्नाअगोदरच मुलींना सासू-सासरे नको असतात, गावाकडच्या मुलींनासुद्धा शेतकरी मुलगा नको, यात मुलींच्या आई-वडिलांच्या सुद्धा अपेक्षा वाढलेल्या दिसत आहेत. सधन व बागायती शेती असलेल्या शिक्षित मुलांची सुद्धा लग्ने जमताना अडचणी येत आहेत. सर्वच मुले काही शहरांत नोकरीसाठी जात नाहीत. काही जण गावाकडील शेती व घर सांभाळतात. त्यांना उत्पन्नसुद्धा चांगले असते; पण केवळ शेतकरी मुलगा नको, या भावनेने अनेक मुलांची लग्ने लांबलेली आहेत. आजही प्रत्येक छोट्या गावातील हेच चित्र पाहावयास मिळते. लग्न जमत नसल्यामुळे मुलांच्या अपेक्षा सुद्धा कमी होत चालल्याचे दिसत आहे.
 
सुमारे दोन-तीन दशकांपूर्वी ही परिस्थिती नव्हती. त्या काळी मुलीचे आई-वडील जो मुलगा पसंत करीत त्याच्याशी लग्न होत असे. शिवाय शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने मुली जास्त शिक्षित झालेल्या नव्हत्या, मुलीच्या वाढत्या अपेक्षेमुळे अनेक मुलींची व मुलांची सुद्धा लग्ने उशिरा होत आहेत किंवा होत सुद्धा नाहीत. हा एक सामाजिक प्रश्न निर्माण होत आहे. आज अनेक लग्न जमविणार्‍या संस्था आहेत. तेथेही मुली किंवा मुलांच्या अपेक्षा वाढलेल्या दिसून येत आहेत. या प्रश्नातूनच लग्न नको हा सुद्धा एका प्रवाह रूढ होत चालला आहे. वाढती महागाई, शिक्षणाचा वाढता खर्च, नवरा-बायको दोघेही नोकरी करणारे अशा परिस्थितीत मुलांचे संगोपन इत्यादी प्रश्न निर्माण होत आहेत. एकूणच हल्लीच्या काळी मुला-मुलींची लग्ने होणे अवघड होत चालले आहे. बरे एवढे करूनही लग्ने झाली तर ती  घटस्फोटापर्यंत केव्हा जातील हे सुद्धा सांगता येत नाही. एकूणच लग्न जमणे व ते टिकणे हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे हे निश्चित. 

Related Articles