साडेपाच महिन्यापूर्वी उद्घाटन झालेल्या बोपखेल पुलासाठी मोजले आणखी साडेसहा कोटी   

महापालिका आयुक्तांचा अजब कारभार

पिंपरी : बोपखेल ते खडकी जोडणारा मुळा नदीवरील पूल ९ ऑक्टोबर २०२४ रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. आता साडेपाच महिन्यानंतर या पुलाच्या कामासाठी आणखी ६ कोटी ५३ लाख ८८ हजार ४६३ रुपये ठेकेदाराला देण्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.
 
बोपखल ते खडकी जोडणार्‍या पुलाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ९ ऑक्टोबर २०२४ रोजी झाले. त्या दिवसापासून या पुलावर वाहतुक सुरू झाली आहे. हा पूल १ हजार ८५६ मीटर लांबीचा आहे. या पुलासाठी १०५ कोटींहून अधिकचा खर्च महापालिकेने केला आहे. सीएमई प्रशासनाने १३ मे २०१५ रोजी बोपखेलचा नागरी रस्ता वाहतुकीस बंद केला होता. त्यामुळे तेथील नागरिकांना १० ते १५ किलोमीटर अंतराचा वळसा मारून ये-जा करावी लागत होती. नव्या पुलामुळे बोपखेलच्या रहिवाशांना साडेनऊ वर्षांनंतर हक्काचा जवळचा मार्ग उपलब्ध झाला. नव्या पुलामुळे वाहतूक सुलभ होऊन त्या परिसरात मोठे गृहप्रकल्प निर्माण होत आहेत.
 
पुलावरून वाहतूक सुरू होऊन साडेपाच महिने झाले आहेत. असे असताना या पुलाच्या खर्चात आणखी ६ कोटी ५४ लाखांची वाढ करण्यात आली आहे. मुळा नदीवर एका विशिष्ट वेळ मर्यादेमध्ये बोपखेलसाठी पुल बांधण्यास मुंबई उच्च न्यायालयाने जानेवारी २०२९ मध्ये महापालिकेस आदेश दिले होते. त्यानंतर महापालिकेने तातडीने निविदा प्रकिया राबविली. त्यावेळी महापालिकेच्या ताब्यात बोपखेलकडील ४०० मीटरपैकी केवळ २१ टक्के जागा ताब्यात होती. पुल बांधण्याच्या कामाचा आदेश टी अ‍ॅण्ड टी इन्फ्रा. लि. ठेकेदार कंपनीस २० जुलै २०२९ रोजी देण्यात आली. कामाच्या मूळ मुदतीत ठेकेदाराने उपलब्ध जागेवर काम पूर्ण केले.
 
संरक्षण विभागाच्या खडकीकडील बाजूस काम करण्यास संरक्षण विभागाकडून ९ सप्टेंबर २०२१ रोजी परवनागी देण्यात आली. कामाचा आदेश दिल्यानंतर दोन वर्षांनी ही परवानगी मिळाली. कोरोना महामारीमुळे काही महिने काम ठप्प होते. कामास अडथळा ठरणार्‍या अतिउच्चदाब वाहन तारा व टॉवर स्थलांतरीत करण्यासााठी अधिक वेळ गेला. ते काम १९ मे २०२४ रोजी पूर्ण झाले. तसेच रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्चा तेलाचे दर वाढले. त्यामुळे ठेकेदाराचे मोठे नुकसान झाले. मुदतवाढीतील भाववाढ फरक म्हणून निविदा रक्कमेच्या ५ टक्के रक्कम देण्याची मागणी ठेकेदाराने महापालिकेकडे केली होती.
 
यासंदर्भात आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली १७ फेब्रुवारी २०२५ रोजी बैठक झाली. संबंधित ठेकेदाराला या कामासाठी मुदतवाढ भाववाढ फरक देण्याच्या अधिन राहून स्थायी समितीने मान्यता दिली होती. या सर्व बाबींचा विचार करून तसेच,सल्लागारांच्या शिफारशीनुसार मनुष्यबळ, साहित्य, माल, पेट्रोल, ऑईल यामध्ये झालेली दरवाढ लक्षात घेऊन ६ कोटी ५३ लाख ८८ हजार ४६३ रूपये ठेकेदारला अदा करण्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे बोपखेल पुलाचा खर्च आणखी वाढला आहे.
 
महापालिकेकडून विलंब झाल्याने शिल्लक बिल अदा
 
कोरोना महामारी, संरक्षण विभागाकडून काम करण्यास परवानगी देण्यास विलंब, अतिउच्चदाब वाहक तारा व टॉवर स्थलांतरासाठी थांबलेले काम आणि इतर कारणांमुळे अनेक महिने बोपखेल पुलाचे काम थांबले होते. महापालिका व इतर कारणांमुळे पुलाच्या कामास बराच विलंब झाला. त्यामुळे ठेकेदाराचे आर्थिक नुकसान झाले. दुसरीकडे भाववाढ झाल्याने कामाचा खर्चही वाढला. ती दरवाढ ठेकेदाराला देणे बाकी होते. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर ती रक्कम देण्यात येत आहे, असे महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.

Related Articles