महिलांचा शब्दकोश   

विरंगुळा, प्रा.डॉ.श्रीकांत तारे 

‘आजकाल रोज कोण साडी नेसतंय?’ हिने सुरुवात केली व मी सवयीनं ‘हो ना!’ म्हटलं. माझा काका शहरातील नामांकित वकील होता व कोर्टात त्याने बोललेले मुद्दे खोडणं न्यायाधीशांनाही कठीण जात असे. तो बोलायला उठला, की समोरचा वकील आपलं सामान आवरू लागे; पण अख्ख्या वैवाहिक जीवनांत, बायकोसमोर त्याने ‘हो ना!’ आणि ‘छे छे, अजिबात नाही’ ही दोनच वाक्ये बोलून संसार रेटलेला मी बघितलंय. काकूनंही आयुष्यभर फक्त प्रश्नार्थी वाक्ये वापरल्याने काकाची सोय झाली. काकाइतकं नाही तरी बरेचदा हा फॉर्म्युला माझ्या वापरात असतो. अर्थात, मी ‘हो ना!’ म्हटलं म्हणजे मला हिचं म्हणणं संपूर्णपणे पटलंय असं अजिबात नाही; पण आपला नवरा आपल्या मताशी सहमत आहे असा तिचा जो समज होतो, त्यामुळे पुढचे विवाद टळतात. त्याचप्रमाणे ‘छे छे, अजिबात नाही’ याचा अर्थ ‘तिला न पटलेला मुद्दा मला अजिबात पटायला नको’ या तिच्या मताशी मी सहमत आहे इतकंच. या दोन वाक्यांची उजळणी वारंवार तिच्यासमोर केली, की माझा दिवस बरा जातो हा माझा आजतागायतचा अनुभव.
 
मंदाताईकडून तिच्या लहान मुलाच्या लग्नात रिटर्न गिफ्ट आलेल्या साडीचा विषय होता. माझ्या चुलत बहिणीकडून ती मिळाल्याने, नैसर्गिक नियमाला धरून ती साडी उघडून न बघताही हिला अजिबात आवडली नव्हती. लग्नाच्या वीस वर्षात मी कधीही न पाहिलेल्या हिच्या एका लांबच्या बहिणीकडून, आम्हाला कधीतरी एक रंगबीरंगी चादर दिली गेली होती. हिने नुसतं वरचं प्लास्टिक बघूनच, ‘बापरे, फारच महागाची दिसते. कशाला उगाच एवढं...’ म्हटलं होतं. त्यानंतर सुमारे महिनाभर, आमच्याकडे येणार्‍या जाणार्‍यांना माहेरची ती चादर दाखवून हिने अक्षरश: काव आणला होता. हे चादर पुराण शेवटी इतकं वाढलं की, माझ्याकडूनचे काही नातेवाईक आमच्या घरी यायला टाळाटाळ करू लागले. ती लाडाची चादर हिने एके दिवशी भिजवून ठेवली असता मी चुकून त्यावर माझा ब्रांडेड पांढरा शर्ट धुवायला टाकला. काही वेळाने चादरीचा रंग समूळ नष्ट होऊन त्यातील विविध रंगांनी माझ्या शर्टाशी कायमचं सख्य केलं आणि माझे अडीच हजार रुपये त्या रंगीत पाण्यांत गेले. त्यानंतर ‘माझ्या बहिणीने तुम्हाला हा शर्ट फुकटात रंगवून दिला’ हे हिचं वाक्य ऐकून मी दाराआड तोंड लपवून पोट दुखेपर्यंत हसलो होतो. ‘तुम्ही खरं सांगा, ही साडी बोहारीण तरी घेईल का?’ हिने त्या साडीकडे एकदाही न बघता प्रश्न टाकला आणि त्यावर मी मान हलवून ‘छे छे, अजिबात नाही’ हे ठराविक उत्तर दिलं. 
 
‘मी ही साडी अजिबात वापरणार नाही.’ ही निर्वाणीचं बोलली. ‘अख्खा वॉर्डरोब भरलाय माझा महागड्या साड्यांनी. हे असलं पोतेरं माझ्या कामवालीला द्यायलाही लाज वाटेल मला.’ हिच्या जिभेवर सरस्वती विराजमान झाली. मला हिचं कौतुक वाटतं, हिला नेमक्या वेळी अचूक शब्द सापडतात. एरवी मला, शब्दकोश धुंडाळूनही ‘पोतेरं’ हा अ‍ॅन्टीक शब्द मिळाला नसता, चुकून मिळाला तर केव्हा वापरावा हे सुचलं नसतं. एका जुन्या, विरलेल्या आणि फेकण्यालायक झाल्यावर लादी पुसायला घेतलेल्या कापडाला पूर्वी पोतेरं म्हणायचे हे मला ठाऊक आहे; पण सासरच्या नातेवाईकांकडून आलेल्या नव्या साडीला हा शब्द आजकाल लागू झालाय, याची मला कल्पना नव्हती. बायकांचा एक स्वतंत्र शब्दकोश असतो हे मला लग्नाच्या पंचविशीनंतर हळू हळू कळू लागलंय. अवेळी झोपून राहिलं की, त्याला ‘तंगड्या वर करून पडलाय’ म्हणतात. हे हिच्या तोंडून प्रथम ऐकलं तेव्हा मला घाम फुटला होता, आता सवय झालीय. राग आला की, चहा पिण्याऐवजी ‘ढोसायचा’ असतो आणि अन्न खाण्याऐवजी ‘गिळायचं’ असतं, दोघांनी बाहेर निघालं की त्याला ‘फिरणं’ आणि एकट्याने निघालं की ‘उंडारणं’ म्हणतात, पायजमा घडी करून कपाटात न ठेवता चुकून पलंगावर ठेवला गेला की, घराचा ‘उकिरडा’ होतो वगैरे माहिती मिळाल्यापासून माझी मातृभाषा अधिआधिक समृद्ध होतेय. 
 
दोन एक आठवड्यानंतर रविवारी सायंकाळी हिला ब्यूटी पार्लरमध्ये सोडलं, आणि तासभराकरता उगाचच घरी जाऊन लोळण्याऐवजी कुणाकडे तरी जाऊन गप्पा माराव्या या विचाराने मी मंदाताईकडे गेलो. नवदाम्पत्याची काही हालचाल घरात दिसत नव्हती आणि मंदाताई एकटीच कपड्यांच्या ढिगांत डोकं धरून बसली होती. ‘कुणी दिसत नाही घरांत?’ मी मोघमच विचारलं. यावर ‘मुलं बाहेर हुंदडायला गेलीत आणि मेहुणे उंडारायला गेलेत ही अमूल्य माहिती मला मिळाली आणि ब्यूटीपार्लरमध्ये बसल्यावर हिला तोंड उघडणं शक्य नसल्यानं तिच्या जिभेवरील सरस्वती हवापालटाला काही वेळाकरता मंदाताईच्या जिभेवर उतरल्याचा अंदाज मी बांधला. ‘ज्याम वैतागले रे मेलं या साड्यांना.’ तिने एकदमच सुरुवात केली. ‘या लग्नांत बत्तीस साड्या आल्या मला. दोन वर्षांपूर्वी मुलीच्या लग्नातील बावीस तशाच आहेत. बरं, देणार्‍यानं चांगलं कापड द्यावं म्हणते मी. अरे काही साड्या तर इतक्या पुचाट आहेत, की त्या एकदाही न नेसता जरी मी बोहारणीला दिल्या तरी मला साधा चमचा नाही मिळणार यावर.’ मी चाटच पडलो. मंदाताईने आमच्या बायकोची शिकवणी लावल्याचं ही बोलली नाही कधी माझ्याजवळ, किंवा या उलटही घडलं असावं. काही असो, या दोघी एकच शब्दकोश वापरतात हे मात्र मला या क्षणाला कळलं. ‘अरे, मी सांगू नये अन् तू ऐकू नये; पण दोन वर्षांपूर्वी मुलीच्या लग्नांत ज्या साड्या मी वाटल्या, त्याच साड्या त्यांच्यावरचं वेष्टनही न बदलता काही बायकांनी मला मुलाच्या लग्नांत दिल्या.’ तिच्या बोलण्याकडे माझं लक्ष आहे किंवा नाही हे न बघता मंदाताईचं तोंड चालू होतं आणि तिचा मान राखला जावा म्हणून मी मान हलवत होतो.
 
दरम्यान मंदाताई चहा टाकायला आत गेल्याचं निमित्त साधून मी पटकन समोरील साड्यांची पारदर्शी पाकिटं मोजली, ती सोळा भरली. माझं गणित कच्चं असलं तरी बत्तीस अधिक बावीस केल्यावर सोळा होत नाही, इतकं प्राथमिक ज्ञान मला नक्कीच आहे. याचा अर्थ, यातील ‘बोहारीणही घेणार नाही’ अशा कित्येक साड्या आणखी कुणाच्या घरांत गेल्या आहेत हे मला उमजलं. कहर म्हणजे, ‘तरी बरं मी परतीला सगळ्यांना महागाच्या साड्या दिल्या.’ असं मंदाताई सद्गदित स्वरांत म्हणाली आणि मी त्यावर ‘खरंय ग मंदाताई, तू आहेस म्हणून ही नाती टिकून आहेत’ असं उत्तर दिलं.
 
सुमारे तासभर ताईसाहेब लग्नात आलेल्या आणि दिलेल्या साड्यांबद्दल माहिती पुरवीत होत्या. शेवटी साड्यांच्या चळतीकडे हात दाखवत ती ‘अरे कुणाला देताही नाही येत रे ही पोतरं’ असं म्हणली, आणि मी दचकलो. बायकोनं आपल्याला ‘उंडारायला’ दिलेली वेळ संपली आहे याची जाणीव मला ‘पोतेरं’ या शब्दाने करून दिली. मी मग उठलोच एकदम. मला आणि जिभेवरील सरस्वतीला हिला ‘पिकप’ करायला ब्यूटी पार्लरच्या दाराशी वेळेवर पोहोचायला हवं होतं. 

Related Articles