‘अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या ३८८ नागरिकांची ओळख पटली   

सर्वजण भारतात परतले’, सरकारची माहिती

अमृतसर : अमेरिकेची सूत्रे पुन्हा एकदा हाती घेतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठ्या प्रमाणात हद्दपारी मोहीम सुरू केली. भारताने तेव्हापासून अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या ३८८ भारतीय स्थलांतरितांची ओळख पटवली असून, ते सर्व भारतात परतले आहेत. यामध्ये अमृतसरमध्ये अमेरिकेच्या लष्करी विमानाने अमेरिकेतून पाठवलेल्या स्थलांतरितांसह इतर देशांमधून, परतलेल्यांचाही समावेश आहे.
 
अमेरिकेत राष्ट्रीयत्व पडताळणी सुरू असून, लवकरच आणखी लोकांना परत पाठवले जाईल अशी अपेक्षा आहे. पण, अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या भारतीयांची संख्या भारताला समजण्याचा कोणताही मार्ग नाही कारण पडताळणीनंतरच ते लोक भारतीय आहेत की, नाही हे कळणार आहे. या संदर्भात खासगी वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.
 
अमेरिकेत राहणाऱ्या बेकायदा भारतीय स्थलांतरितांच्या संख्येबद्दल कोणताही माहिती नसल्याचे सरकारने म्हटले. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी राज्यसभेत सांगितले की, “याचे कारण असे आहे की, या स्थलांतरितांनी कायदेशीररित्या भारत सोडला आहे. परंतु त्यांच्या अमेरिकन व्हिसाच्या वैधतेचा कालावधी उलटून गेला आहे किंवा ते बेकायदा किंवा वैध कागदपत्रांशिवाय अमेरिकेत दाखल झाले आहेत.”
 
अमेरिकेतून हद्दपार केलेल्या लोकांच्या यादीची वेगवेगळ्या भारतीय संस्था बारकाईने तपासणी करतात. ज्या लोकांकडे भारतीय नागरिक असल्याची पुष्टी होते त्यांनाच स्वीकारले जाते. काही दिवसांपूर्वी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संसदेत दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, परदेशात बेकायदा राहणाऱ्या आपल्या नागरिकांना स्वीकारणे ही सर्व देशांची जबाबदारी आहे.
 
गेल्या काही दशकांपासून भारत अमेरिकेतून येणाऱ्या निर्वासितांना स्वीकारत आहे, २०१९ मध्ये सर्वाधिक २,०४२ निर्वासितांना स्वीकारले होते. त्यानंतर गेल्या वर्षी अमेरिकेने १,३६८ बेकायदा भारतीयांना हद्दपार केले होते.

अमेरिकेत बेकायदा राहणारे भारतीय

अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या भारतीयांची अचूक आकडेवारी कोणाकडेही नाही. 'प्यू रिसर्च सेंटर' आणि 'सेंटर फॉर मायग्रेशन स्टडीज ऑफ न्यूयॉर्क'ने २०२२ पर्यंत सुमारे ७००,००० भारतीय लोक अमेरिकेत बेकायदा राहत असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर मेक्सिको आणि एल साल्वाडोर या देशांतील सर्वाधिक नागरिक अमेरिकेत बेकायदा राहत असल्याचे म्हटले आहे. या संदर्भातील बीबीसीने वृत्त दिले.

जयशंकर यांचे स्पष्टीकरण

‘कुठलेही कागदपत्रे नसलेल्या आणि अमेरिकेत राहत असलेल्या भारतीयांना भारतात वैध मार्गाने परत आणण्यासाठी भारताचे दरवाजे कायमच खुले आहेत,’ असे वक्तव्य परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलताना केले होते. ‘अमेरिकेतील नेमक्या किती भारतीयांना परत आणता येईल, या संबंधीची प्रक्रिया सुरू असून, अंतिम आकडा अद्याप निश्चित झालेला नाही,’ असेही ते म्हणाले होते.
 

Related Articles