देशभर होळी उत्साहात; संभळमध्येही शांततेत   

नवी दिल्ली : संपूर्ण देशात शुक्रवारी होळी उत्साहात साजरी करण्यात आली. धुळवडनिमित्त गुलालाची मुक्त उधळण करण्यात आली. एकमेकांना शुभेच्छा देत आणि मिठाई भरवत होळी साजरी करण्यात आली. ब्रज आणि काशीमधील होळी अनुभवण्यासाठी देशभरातून नागरिक आले होते. 
 
बहुतांश प्रमुख शहरात सकाळी सार्वजनिक वाहतूक बंद होती. मात्र, दुपारपासून सार्वजनिक वाहतूक सुरू झाली. मेट्रो सेवादेखील दुपारनंतर सुरु करण्यात आली.सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. होळी आणि जुम्माची नमाज एकाच दिवशी आली होती. त्यामुळे, कोठेही अनुचित प्रकार घडू नये, याची सरकार आणि प्रशासनाने विशेष काळजी घेतली होती.
 
उत्तर प्रदेशातील संभळमध्ये २४ नोव्हेंबर रोजी दंगल उसळली होती. या पार्श्वभूमीवर संभळमध्ये मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काल पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. तर, दुपारी अडीच वाजता मुस्लिम धर्मीय नागरिकांनी शुक्रवारची नमाज अदा करण्यात आली.
 
होळीनिमित्त अनेक राज्यांत बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. दिल्लीत २५,००० हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. याखेरीज, सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या सहाय्याने संवेदनशील भागांवर नजर ठेवले जात होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होळीच्या पूर्वसंध्येला होळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही होळीनिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या.उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, हरयाना, पंजाब, चंडीगढ, आसाम, तेलंगणा, पश्चिम बंगालमध्येही होळी उत्साहात साजरी झाली. 
 

Related Articles