पंजाबमध्ये शिवसेना नेत्याची हत्या   

मोगा, (पंजाब) : पंजाबमधील मोगा जिल्ह्यात शिवसेना नेत्याची गुरुवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हल्ल्यात एक मुलगा जखमी झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली.मंगत राय उर्फ मंगा असे मृत व्यक्तीचे नाव अहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेचे ते जिल्हा अध्यक्ष होते. 
 
किराणा सामान घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मंगा (वय-५२) यांच्यावर परवा रात्री १० च्या सुमारास तीन अनोळखी व्यक्तींनी हल्ला केला. दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी अचानक गोळीबार केला. त्यापैकी, पहिली गोळी चुकली आणि एका बारा वर्षाच्या मुलाला लागली. त्यानंतर, मंगा यांनी दुचाकीवरुन पळ काढला. मात्र, हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करत पुन्हा गोळीबार केला. यात ते गंभीर जखमी झाले. तर, हल्लेखोरांनी तेथून पोबारा केला. मंगा यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 
 
या प्रकरणी मंगा यांच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिकंदर सिंह, वीरेंद्र कुमार, साहिल कुमार, जग्गा सिंह, शंकर आणि अरुण सिंगला अशी त्यांची नावे आहेत.वैयक्तिक वैमनस्यातून ही घटना घडली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त करण्यात आली असली तरी, त्यांचे कोणाशीही वैर नसल्याचे मृताच्या कुटुंबीयांनी सांगितले. 
 
आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी येथील प्रताप चौकात काही संघटना आणि मंगा यांच्या कुटुंबीयांनी निदर्शने केली. पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडल्याचा आरोप करत ‘आप’ सरकारविरोधात यावेळी घोषणा देण्यात आल्या.

Related Articles