विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर   

खासदार के. राधाकृष्णन यांचा आरोप
 
तिरुअनंतपुरम : अंमलबजावणी संचालनालय (ईडी) सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केवळ केरळमध्येच नव्हे; तर संपूर्ण देशात राजकीय विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्र सरकारकडून केला जात असल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) खासदार के. राधाकृष्णन यांनी शुक्रवारी केला. 
 
करुवन्नूर सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात राधाकृष्णन यांना नोटीस बजावली आहे. यासंदर्भात, प्रसारमाध्यमांनी विचारले असता राधाकृष्णन यांनी हा आरोप केला. या नोटीसमध्ये करुवन्नूर प्रकरणाचा उल्लेख नाही. मात्र, बँक खाती आणि जमिनीच्या नोंदीसह मालमत्तेचे तपशील सादर करण्यास ईडीने सांगितले असल्याचे राधाकृष्णन यांनी म्हटले आहे.
 
सध्या संसदेचे अंदाजपत्रकी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे, आपण चौकशीस हजर राहू शकत नाही. पण, अधिवेशन संपताच चौकशीसाठी हजर होऊ, असे आपण ईडीला कळविले असल्याचे राधाकृष्णन यांनी सांगितले.राधाकृष्णन हे केरळमधील अलाथूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. मी कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार आहे. ते मी कमावलेल्या मालमत्तेचा शोध घेत आहेत. त्यांना चौकशी करु द्या. सत्य समोर येईल, असे राधाकृष्णन यांनी सांगितले.या प्रकरणात ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) राधाकृष्णन यांना १५ मार्च रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.
 

Related Articles