पुणेकरांचे प्रेम कधीही विसरू शकत नाही   

अशोक सराफ यांचे प्रतिपादन 

पुणे : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण अशा थोर व्यक्तीच्या नावाने मला पुरस्कार मिळाला, हे माझे भाग्यच आहे. पुणेकरांनी आजपर्यंत मला भरभरून प्रेम दिले आहे, त्यांचे हे प्रेम मी कधीही विसरू शकणार नाही. मला मिळालेले पुरस्कार मी जपून ठेवले असून ते मला सतत ऊर्जा देणारे आहेत, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केली.
 
प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट व गंगालॉज मित्र मंडळातर्फे यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त ‘कला जीवनगौरव पुरस्कार’ अशोक सराफ यांना जेष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते टिळक स्मारक मंदिरात  प्रदान करण्यात आला, यावेळी सराफ बोलत होते. यावेळी दिग्दर्शक व अभिनेते नागराज मंजुळे उपस्थित होते.  
 
सराफ म्हणाले, थोर व्यक्तीच्या नावाने मला पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार माझा सन्मान आहे, प्रेम मी विसरणार नाही. पुणेकरांनी नेहमीच माझे कौतुक केले याचेही यावेळी त्यांनी नमूद केले. डॉ. मोहन आगाशे म्हणाले, अशोक सराफ हा कलाकार तळागाळात मिसळणारा आहे. त्यांच्यात बडेजावपणा, इगो अजिबात नाही. कधीही केव्हाही भेटणारा साधा सरळ हा माणूस आहे. साध्या सरळ माणसाला हा पुरस्कार मिळाल्याने खरोखर आनंद आहे. 
 
नागराज मंजुळे म्हणाले, अशोक मामाच्या साध्या आणि सरळ स्वभावामुळे मीच नव्हे, तर अख्खा महाराष्ट्र त्यांचा चाहता आहे. हा माणूस आभाळासारखा आहे. कारण मी त्यांना अनुभवलं आहे. मी काहीही नसताना त्यांचा बाईट घेण्यासाठी गेलो असता, कुठून आला, कोण आहेस असे कोणतेही आढेवेढे न घेता माझ्या खांद्यावर हात ठेवून मला पहिला बाईट दिला. हा माणूस चित्रपट क्षेत्रातलाच नव्हे तर खर्‍या जीवनातला देखील हिरो आहे. 
 
रामदास फुटाणे म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांचा संस्कृतपणा आणि राजकारण पुढे घेऊन जायचे आहे. सध्याची महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृतपणा हरवत चाललेला आहे. महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा जोपासण्याचे आपले सर्वांचे काम आहे. यशवंतरावाचा सुसंस्कृतपणा ढेरे-जाधव परिवार जोपासत आहे. याप्रसंगी सुनिता झाडे, फेलिक्स डिसोजा, सफर अली इसफ यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles