नाराज नाही; पण, बाहेर बोलायची चोरी!   

बारामती, (वार्ताहर) : मी नाराज नाही, असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. पण, त्याचवेळी मला बाहेर बोलायची चोरी झाली आहे, असे ते म्हणाले.
 
नाराज असल्याच्या चर्चांबद्दल पाटील  म्हणाले, मी जे भाषण केले, त्याचा संदर्भ तुम्ही काढून बघा. शक्तीपीठ रस्त्याला विरोध करण्यासाठी जो मोर्चा आला होता, त्यांच्यासमोर मी भाषण करताना सांगितले होते की, कालांतराने भरपाईची रक्कम वाढली की ते घेतात आणि गप्प बसतात. त्यामुळे तुम्हा सर्वांचे नक्की आहे का? तुम्ही शेवटपर्यंत नेणार आहात का? राजू शेट्टी यांनी हा झेंडा हातात घेतला आहे म्हटल्यानंतर काळजीचे कारण नाही, असे म्हटले होते. तो विनोदाचा भाग होता की, राजू शेट्टींचा आमच्यावर विश्वास नाही, आम्ही त्यांना उभे राहायला सांगितले होते. त्यामुळे माझे काही तुम्ही गृहीत धरू नका. खरे धरू नका. तुमचे आंदोलन सुरू ठेवा, त्याला आमचा पाठिंबा आहे. अशी त्यामागची भावना होती, अशी भूमिका जयंत पाटील यांनी ‘माझं काही खरं नाही’, या विधानावर मांडली.
 
मी नाराज आहे पासून ते पक्ष बदलण्यापर्यंत गाडी गेली! वास्तविक, याचे स्पष्टीकरण मी त्याच दिवशी दिले होते, असेही ते म्हणाले. बारामतीत कृषी विज्ञान केंद्राने ऊस शेतीत केलेल्या एआय तंत्रज्ञानाच्या वापराची पाहणी करण्यासाठी पाटील आले होते. त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. 
 
यावेळी पाटील म्हणाले, आम्ही सर्व एका कुटुंबातील आहोत. एकमेकांना इशारा देऊन बसत नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष आहे. आज आमचा पराभव झाला आहे. निवडून आलेल्यांची संख्या कमी असली तरी महाराष्ट्रात शरद पवारांवर प्रेम करणारे लाखो नागरिक आहेत. जो काही असेल तो पक्षाच्या हिताचा निर्णय एकत्रित करू. एकट्याने इकडे जाणे, तिकडे जाणे हा विषय आम्ही चर्चेला घेऊ शकत नाही आणि तो होणारही नाही.
 

Related Articles