कुबड्या घेऊन राहुल द्रविडचे खेळाडूंना प्रशिक्षण   

मुंबई : आयपीएल सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्याआधी सर्वच संघ आपल्या खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर लक्ष देत आहेत. मुंबई इंडियन्सचा जसप्रीत बुमरा आणि लखनऊ सुपर जायंट्सचा मयंक यादव यांना दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावे लागणार असल्याची मिळाली आहे. खेळाडूंच्या दुखापतींबाबत चर्चा सुरु असताना राजस्तान रॉयल्समध्ये थेट प्रशिक्षक दुखापतग्रस्त झाला. राजस्तानचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड एका किरकोळ दुर्घटनेमुळे जखमी झाला. त्यामुळे त्याच्या पायावर प्लास्टर चढवण्यात आले. पण असे असतानाही तो मैदानावर आला आणि मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली.
 
राजस्तान रॉयल्सने द्रविडचा एक व्हिडीओ शेअर केला. त्यात दिसले की, द्रविड बग्गीतून मैदानात आला. त्यानंतर त्याने कुबड्यांच्या सहाय्याने मैदानात फेरफटका मारला आणि सर्व खेळाडूंशी ट्रेनिंग घेत संवाद साधला. यशस्वी जैस्वाल, रियान पराग यांसारख्या अनुभवी खेळाडूंना त्याने काही टिप्सदेखील दिल्या.  तसेच इतर सपोर्ट स्टाफशीही द्रविडने गप्पा मारल्या आणि संघाचे वातावरण एकदम हसत खेळत ठेवले. द्रविडच्या पायाला दुखापत झालेली आहे. राजस्तान रॉयल्सच्या म्हणण्यानुसार, द्रविडला क्रिकेट खेळताना दुखापत झाली आहे.राहुल द्रविडच्या दुखापतीबद्दल माहिती देताना राजस्तान रॉयल्सने इंस्टाग्रामवर लिहिले होते की, बंगळुरूमध्ये क्रिकेट खेळताना त्याला दुखापत झाली आहे. राहुल द्रविड शक्य तितक्या लवकर तंदुरूस्त होण्याचा प्रयत्न करत आहे. याच दरम्यान, जयपूरमध्ये येऊन तो संघाच्या ताफ्यात सामील होईल.त्यानुसार, द्रविडने खेळाडूंसोबत मैदानात उपस्थिती लावायला सुरुवात केली. गेल्या हंगामात राजस्तान रॉयल्स संघाने चांगला खेळ केला होता. हा संघ पॉइंट्स टेबलमध्ये तिसर्‍या क्रमांकावर होता पण अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. यावेळी राजस्थानला आशा आहे की द्रविडच्या मार्गदर्शनाखाली संघ अधिक चांगली कामगिरी करेल. २००८ मध्ये राजस्थान रॉयल्सने आयपीएल जिंकले होते, त्यानंतर त्यांना विजेतेपद मिळालेले नाही. 
 

Related Articles