बीसीसीआय श्रेयस अय्यरबरोबर महत्त्वपुर्ण करार करणार   

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ लवकरच आगामी वार्षिक वर्षासाठी केंद्रीय करार यादी जाहीर करणार आहे. चॅम्पियन्स चषकामधील खेळाडूंच्या कामगिरीचे मूल्यांकन केल्यानंतर बोर्ड यादी जाहीर करणार आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्येच ही यादी जाहीर करण्यात आली होती, परंतु यावेळी चॅम्पियन्स चषकामुळे ती लांबली.
 
गेल्या वर्षी, केंद्रीय करार यादीतून वगळलेल्या खेळाडूंमध्ये श्रेयस अय्यर हे एक मोठे नाव होते. देशांतर्गत क्रिकेट गांभीर्याने न घेतल्यामुळे त्याला वगळण्यात आले. चॅम्पियन्स चषकामधील त्याच्या शानदार कामगिरीनंतर आता त्याला बीसीसीआयच्या केंद्रीय कराराच्या यादीत समाविष्ट करू शकते.
 
गेल्या वर्षी बीसीसीआयच्या करार यादीत समाविष्ट असलेले अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भाग न घेतल्यामुळे यावेळी यादीतून बाहेर पडू शकतात. आवेश खान, रजत पाटीदार, केएस भरत हे खेळाडू यावेळी बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीतून बाहेर पडू शकतात. गेल्या वर्षी तिन्ही खेळाडूंना क श्रेणीमध्ये ठेवण्यात आले होते. सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये समाविष्ट झाल्यानंतर रजत पाटीदारने गेल्या कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नाही. पण, त्याने सय्यद मुश्ताक अली चषकाच्या गेल्या आवृत्तीत शानदार कामगिरी केली. आणि तो दुसर्‍या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता, पण त्याला भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० मालिकेत स्थान मिळाले नाही. यावेळी, आयपीएलमध्ये बंगळुरुचे नेतृत्व करणारा रजत पाटीदार बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीतून बाहेर पडू शकतो.गोलंदाज आवेश खान देखील केंद्रीय करार यादीतून बाहेर पडू शकतो. 
 

 

Related Articles