आयएसआयसाठी हेरगिरी करणार्‍या दोघांना अटक   

 

गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप
 
आग्रा : पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी (आयएसआय) हेरगिरी करणार्‍या दोघांना उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यापैकी, एक जण फिरोजाबाद येथील दारुगोळा कारखान्यात काम करत होता. 
 
रवींद्र कुमार असे त्याचे नाव आहे. आयएसआयच्या महिला एजंटने रवींद्र याला हनीट्रॅपमध्ये अडकवले. तिने आधी समाज माध्यमावर रवींद्रशी मैत्री केली. त्यानंतर, त्याच्याकडून संवेदनशील माहिती जमा करू लागली. यामध्ये भारतीय लष्करासह गगनयान प्रकल्पाशी संबंधित काही महत्त्वाच्या माहितीचा समावेश असल्याचे वृत्त आहे.
 
रवींद्र कुमार हा फिरोजाबादमधील हजरतपूर येथील दारुगोळा कारखान्यात काम करत होता. एका आयएसआय महिला एजंटने समाज माध्यमावर नेहा शर्मा नावाने बनावट खाते उघडले आणि रवींद्र याच्याशी ओळख करुन घेतली. त्यानंतर, तिने रवींद्रला जाळ्यात ओढले. तसेच, तिच्याकडून गोपनीय माहिती मिळविण्यास सुरूवात केली. यामध्ये भारतीय लष्कर, गगनयान मोहीम, ड्रोन आणि अन्य काही गोपनीय माहितीचा समावेश आहे.
 
गेल्या वर्षी नेहा शर्मा असल्याचे भासवून संबंधित महिलेने रवींद्र याच्याशी संपर्क साधला होता. आपण पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी काम करत असल्याचे सांगून देखील ती रवींद्र याला हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढण्यात यशस्वी झाली. दोघांमधील संभाषण लपवून ठेवण्यासाठी रवींद्र याने त्याच्या फोनमध्ये तिचा नंबर चंदन स्टोअर कीपर २ म्हणून सेव्ह केला होता. तसेच, त्याने आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात त्या महिलेला गोपनीय कागदपत्रे व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवल्याचा आरोप आहे.
 
रवींद्र हा पाकिस्तानातील आयएसआय हँडलर्सच्या थेट संपर्कात होता आणि भारतातील सुरक्षा प्रकल्पाबद्दलची माहिती तो त्यांना पुरवत होता. रवींद्र याला अटक केल्यानंतर एटीएसने त्याच्या आग्रा येथील सहकार्‍यालाही अटक केली आहे. तसेच, तपास यंत्रणांनी डिजीटल पुरावे जप्त केले आहेत. ज्यामध्ये व्हॉट्सअ‍ॅप चॅट आणि गोपनीय कागदपत्रांचा समावेश आहे, या प्रकरणाची गंभीर दखल घेत उत्तर प्रदेश एटीएसने सखोल चौकशीला सुरूवात केली आहे. रवींद्र आणि त्यांच्या संपर्कात असणार्‍यांचा शोध घेतला जात आहे. 
 

Related Articles