सतीश भोसले याच्या घरावर बुलडोझर   

बीड : शिरूरमध्ये ढाकणे पिता-पुत्राला अमानुष मारहाण करणारा सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या घरावर वनविभागाने गुरूवारी बुलडोझर फिरवला. 
ढाकणे पिता-पुत्राला मारहाण, वन्य प्राण्यांची शिकार, नोटांचे बंडल उधळणे यासारख्या प्रकारांमुळे सतीश भोसले मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. तो भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. त्याने बीड जिल्ह्यातील शिरूर कासारपासून काही अंतरावर वनविभागाच्या जागेत अतिक्रमण करून घर बांधले होते. कारवाई करण्यापूर्वी वन विभागाने त्याला नोटीस पाठवली होती. मात्र, ४८ तासांमध्ये उत्तर न आल्यामुळे त्याच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आला. बुलडोझर फिरवण्याआधी वन विभागाच्या अधिकार्‍यांनी त्याच्या घराची झडती घेतली. घरातील साहित्य बाहेर काढले. नंतर त्याच्या अनधिकृत घरावर बुलडोझर फिरवला.  शेकडो वन्यप्राण्यांची शिकार केल्याच्या आरोपानंतर वनविभागाने मागील आठवड्यात त्याच्या घरावर छापा टाकला होता. त्यावेळी त्याच्या घरात वन्यप्राण्यांचे सुकवलेले मांस आणि शिकारीसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात होते. 
 
दरम्यान, बीडमधील मारहाण प्रकरणानंतर फरार असलेल्या भोसले याला उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये अटक करण्यात आली. त्याच्यावर शिरूर, आष्टीे, पाटोदा आणि आंबोरा पोलिस ठाण्यांमध्ये एकूण १२ गुन्हे दाखल आहेत. भोसलेला प्रयागराजमध्ये अटक होताच बीड पोलिसांकडून त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव देखील मंजूर करण्यात आला. गेल्या एक वर्षापासून उपविभागीय अधिकारी बीड यांच्याकडे तडीपारीचा प्रस्ताव प्रलंबित होता.  
 

Related Articles