प्रवाशांना उत्तम सेवा हेच ध्येय   

महाराष्ट्र राज्य मार्ग महामंडळाच्या (एसटी) बसने प्रवास करणारे प्रवासी हे सर्वसामान्य असतात. त्यामुळे या प्रवाशांना उत्तम आणि सुरक्षित वाहतूक प्रवास घडविणे हेच माझे ध्येय आहे. कारण प्रवासी सेवेत जो आनंद मिळतो, तो इतर कार्यातून कदाचित मिळाला नसता. महिला चालक म्हणून मला कधीच प्रवाशांचे ओझे वाटले नाही. सुरक्षित प्रवास घडवून आणण्याची जबाबदारी मी आजपर्यंत उत्तम रीतीने पार पाडली आहे. अशी भावना चालक रेश्मा ठुबे यांनी 
व्यक्त केली. 
 
रेश्मा ठुबे या अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर येथील रहिवासी आहेत. सद्य:स्थितीत त्या शिरूर आगारात कार्यरत आहेत. ठुबे एक वर्षाचे प्रशिक्षण घेऊन प्रवाशांच्या सेवेत रूजू झाल्या आहेत. ठुबे म्हणाल्या, प्रवाशांनी भरलेली बस चालविणार्‍या महिला चालकांची संख्या मुळात कमी आहे. कारण ही नोकरी जबाबदारीची आहे. बसच्या स्टेअरिंगवर बसल्यानंतर सुमारे ५० प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी चालकावर असते. त्यामुळे सतत जबाबदारीची जाणीव मनात जागृत ठेवून बस चालवावी लागते, असेही ठुबे यांनी सांगितले. 
 
प्रारंभी बस चालक म्हणून नोकरी करायचे म्हटल्यावर कुटुंबाने आश्चर्य व्यक्त केले होते. मात्र ही नोकरी करण्यावर मी ठाम होते. नंतर आई-वडिलांनी मला सहकार्य केले. प्रशिक्षण घेतल्यानंतर मी प्रत्यक्ष बस चालवायला सुरुवात केली. पहिले काही दिवस मोठी बस चक्क रस्त्यावर चालवायची याबाबत मनावर थोडे दडपण होते. मात्र आता सवय झाली आहे. रोज आनंदाने विविध मागार्ंंवर बस चालवीत आहे. आजपर्यंत विना अपघात सेवा दिली आहे. तसेच आगाराचे उत्पन्न वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करत असल्याचेही रेश्मा ठुबे यांनी सांगितले.
-रेश्मा ठुबे,चालक, शिरूर आगार

Related Articles