पालघरच्या चार खलाशांचा गुजरातमध्ये बोट दुर्घटनेत मृत्यू   

अहमदाबाद : समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या गुजरातमधील नामे निराली या बोटीला मासेमारी करून परतत असताना अपघात झाला. या दुर्घटनेत पालघरमधील चार मच्छिमार खलाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अक्षय वाघात, अमित सुरम, सुरज वळवी आणि सूर्या शिंगडा या चार जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. तर अनिल वांगड आणि जलाराम वळवी यांना बाहेर काढण्यात गुजरात प्रशासनाला यश आले आहे. हे सर्वजण हे पालघरच्या घोलवड पोलिस ठाणे हद्दीतील झाई येथील रहिवासी आहेत. 
 
गुजरातमधील दीव नजीकच्या वनगबार बंदरातू नामे निराली ही बोट १८ फेब्रुवारी रोजी १० खलाशांसह खोल समुद्रात मासेमारीसाठी गेली होती. १६ दिवसांनंतर मासेमारी करून परतत असताना या बोटीला भीषण अपघात झाला. त्यानंतर बोट बुडून चार खलाशांचा मृत्यू झाला तर दोन खलाशांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पालघरच्या ग्रामीण भागातील शेकडो खलाशी हे रोजगारासाठी गुजरातमधील मासेमारी बोटींवर खलाशी म्हणून काम करतात. या दुर्घटनेनंतर त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. 

Related Articles