कारागृहातील साहित्य खरेदीमध्ये पाचशे कोटींचा गैरव्यवहार   

राजू शेट्टी यांची चौकशीची मागणी

पुणे : राज्यातील कारागृहांमध्ये असलेल्या कैद्यांसाठी लागणारा किराणा माल, खाद्यपदार्थ आणि विद्युत उपकरणे यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीत पाचशे कोटींपेक्षा जास्त रूपयांचा गैरव्यवहार झाला आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला. या गैरव्यवहारामध्ये राज्यातील अनेक बड्या अधिकार्‍यांचा समावेश असून, तत्कालीन अप्पर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता आणि पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही शेट्टी यांनी केली.
 
केंद्रीकृत पद्धतीने करण्यात येत असलेल्या निविदा प्रक्रियेत विशिष्ट व्यापार्‍यांची मक्तेदारी दिसते. त्यामुळे बाजारात ३०-३५ रूपयांना मिळणारा गहू ४५ रूपये ९० पैसे दराने, ३५ रूपये किमतीचा तांदूळ ४४ रूपये ९० पैसे तर, १०० रूपये किलोेने मिळणारी तूरदाळ २०९ रूपये दराने कारागृहातील कैद्यांसाठी खरेदी केली जाते. २०२४ पासून आतापर्यंत केलल्या या वस्तूंंच्या खरेदीत सुमारे पाचशे कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे दिसून येते, असा आरोप शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केला.
 
शेट्टी म्हणाले, राज्यातील कारागृहांमध्ये कैद्यांच्या पालनपोषणासाठी राज्य सरकारकडून कोट्यावधी रूपयांचा खर्च करण्यात येतो. कैद्यांसाठी गहू, तांदूळ, साखर, डाळी, दुध, फळे, भाजीपाला, कांदा, बटाटा, चिकन-मटण, अंडी आणि बेकरी पदार्थ यांसारख्या वस्तूंची खरेदी करण्यात येते. मात्र, ही खरेदी करताना अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य बाजार भावापेक्षा अधिकच्या दराने खरेदी करण्यात येते.गुणवत्तापूर्ण मालाचा पुरवठा करणे बंधनकारक असताना अनेक कारागृहात नाशवंत, मुदतबाह्य, निकृष्ठ, बुरशीजन्य माल पुरवला जातो. कारागृह अधीक्षक हर्षद अहिरराव यांनी याबाबतचा लेखी अहवाल दिला आहे. मात्र, तरीदेखील कारवाई केली जात नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

Related Articles