इक्वेडोरच्या अध्यक्षपदी पुन्हा डॅनियल नोबोआ   

लुईसा गोंजालेज यांच्याकडून फेरमतमोजणीची मागणी 

क्विटो : इक्वेडोरमध्ये गुन्हेगारीला कंटाळलेल्या मतदारांनी डॅनियल नोबोआ यांना पुन्हा देशाच्या अध्यक्षपदी निवडून दिले. नोबोआ यांना ५५.८ टक्के मते मिळाली तर प्रतिस्पर्धी लुईसा गोंजालेज यांना ४४ टक्के मते मिळाली. गोंजालेज यांनी हा निकाल फेटाळून लावत फेरमतमोजणीची मागणी केली आहे.  निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याचा त्यांचा आरोप आहे. 
 
इक्वेडोरमध्ये रविवारी सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. दुहेरी मतदान, बनावट मतपत्रिकांचा वापर आणि मतांचे छायाचित्रण यासह मतपत्रिकेशी छेडछाड केल्याप्रकरणी पोलिसांनी रविवारी जवळपास सहाशे जणांना अटक केली. काही शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवार लुईसा गोंजालेज यांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे. 
 
नोबोआ यांनी ऑक्टोबर २०२३ पहिल्यांदा अध्यक्ष झाल्यानंतर देशातील  गुन्हेगारी टोळ्या आणि अमली पदार्थांच्या चोरट्या व्यापाराविरोधात मोहीम उघडली होती. त्यांच्या कार्याच्या जोरावर मतदारांनी त्यांना पुन्हा निवडले.राष्ट्रीय मतदान परिषदेच्या अध्यक्षा डायना अटामेन म्हणाल्या, या निकालांमध्ये नोबोआ यांच्या बाजूने अपरिवर्तनीय कल दिसून आला. या विजयामुळे नोबोआ यांना २०२३ मध्ये पहिल्यांदा दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी आणखी चार वर्षांचा कालावधी मिळाला आहे. 

डॅनियल नोबोआ कोण आहेत?

डॅनियल नोबोआ हे इक्वेडोरियन राजकारणी आणि उद्योगपती आहेत. इक्वेडोरमधील केळी निर्यातदार अल्वारो नोबोआ आणि डॉक्टर अ‍ॅनाबेला अझिन यांचे ते पुत्र. दोन वर्षांपूर्वीच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. इक्वेडोरचे विधिमंडळ बरखास्त झाल्यानंतर ऑक्टोबर २०२३ मध्ये मध्यावधी निवडणुकीत ते सत्तेवर आले. त्यांनी गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी मोहीम उघडली. २०२३ मध्ये मध्यावधी निवडणुकीत नोबोआ यांनी गोंजालेज यांचा ५० टक्क्यांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला.
 

Related Articles