मेहुल चोक्सी याला बेल्जियममध्ये अटक   

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेतील १३ हजार कोटींच्या गैरव्यवहारानंतर फरारी झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे. केंद्रीय गुप्तचर विभाग (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) विनंतीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी सोमवारी दिली.चोक्सी याला शनिवारी अटक करण्यात आली. सध्या तो बेल्जियममधील कारागृहात बंद आहे. मागील वर्षभरापासून तो उपचारानिमित्त बेल्जियममध्ये होता.
 
२०१८ मध्ये त्याने भारतातून पलायन केले होते. भारत सोडल्यानंतर तो अँटिग्वामध्ये राहत होता. चोक्सी याच्याविरुद्ध इंटरपोलने रेड नोटीस बजावली  होती. २३ मे २०१८ आणि १५ जून २०२१ रोजी चोक्सीविरुद्ध मुंबईतील न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले होते. चोक्सी हा आजारी आहे. तो  प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मागू शकतो, असे अधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान, चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनीदेखील यासंदर्भातील प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. चोक्सी याला कर्करोग झाला असून तो बेल्जियममध्ये उपचार घेत होता, असेही त्यांनी सांगितले.
 
चोक्सी आणि नीरव मोदी हे दोघेही पंजाब नॅशनल बँकेतील गैरव्यवहारानंतर फरारी झाले आहेत. चोक्सी पत्नीसोबत सध्या बेल्जियममध्ये राहत होता. त्याने अँटिग्वा-बार्बुडाचे नागरिकत्व घेतले होते. नीरव हा लंडनमध्ये आहे. चोक्सीप्रमाणेच नीरव याचा ताबा मिळावा, यासाठी भारत प्रयत्नशील आहे. चोक्सी, त्याची कंपनी गीतांजली जेम्स आणि इतरांनी पीएनबीमध्ये संगनमताने गैरव्यवहार केला. त्यामुळे बँकेचे कोट्यवधीचे नुकसान झाले. या प्रकरणात सीबीआयने चोक्सीविरुद्ध दोन आरोपपत्रे दाखल केली आहेत. तर, ईडीकडे तीन तक्रारी दाखल केल्या होत्या.
 
नीरव सध्या लंडनमध्ये अटकेत आहे. आर्थिक अफरातफर प्रकरणात त्याच्यावर कारवाई झाली आहे. त्याने जामिनासाठी अनेक वेळा प्रयत्न केला. पण, जामीन नाकारला गेला. नीरव हा चोक्सी याचा भाचा आहे. ईडीने चोक्सी याची २,५६५.९० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. बंगळूर येथील उद्योजक हरीप्रसाद एस.व्ही. यांनी २०१६ मध्ये चोक्सीच्या कथित गैरव्यवहाराबद्दल पीएमओला माहिती दिली होती. चोक्सी याने प्रकृतीचे आणि पारपत्र रद्चे कारण पुढे करत भारतात येण्यास वारंवार नकार दिला आहे. 
 

Related Articles