तहव्वूरची दररोज आठ ते दहा तास चौकशी   

नवी दिल्ली : मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा याची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) दररोज आठ ते दहा तास चौकशी केली जात आहे. या हल्ल्यामागील मोठ्या कटाचा लवकरच उलगडा होईल, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी सोमवारी दिली.मागील आठवड्यात तहव्वूर याला अमेरिकेने भारताकडे सोपविले. शुक्रवारी पहाटे न्यायालयाने तहव्वूर याला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली. 
 
चार दिवसांपासून तहव्वूर याची १२ उच्च अधिकारी कसून चौकशी करत आहेत. तहव्वूर याचे लष्कर ए तोयबाशी असलेले संबंध तपासले जात आहेत. यासोबतच, भारतात त्याला कोणी-कोणी मदत केली, याचीही चौकशी करत आहेत. तहव्वूर याने पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या चिचबुतनी गावचा रहिवासी असल्याचे म्हटले आहे. त्याचे वडील मुख्याध्यापक होते. त्याला एक भाऊ आहे. तहव्वूरने पाकिस्तानी लष्करात काम केले आहे. त्याचा भाऊ पत्रकार आहे. तहव्वूर याने हसन अब्दाल महाविद्यालयातून शिक्षण घेतले होते. येथेच त्याची डेव्हिड कोलमन हेडली उर्फ दाऊद गिलानी याच्याशी मैत्री झाली. ते दोघेही पाच वर्षे एकाच महाविद्यालयात होते. तहव्वूर निवृत्तीनंतर पत्नीसोबत १९९७ मध्ये कॅनडामध्ये स्थलांतरित झाला. तेथे त्याने व्यवसाय सुरू केला, असे त्याने जबाबात म्हटले आहे.तहव्वूर यास मागणीप्रमाणे  पेन, कोरे कागद आणि कुराण देण्यात आले आहे. त्याने जेवणाबाबत कोणतीही विशेष मागणी केली नाही. 
 
कारागृहाच्या नियमावलीनुसार त्याला जेवण दिले जात आहे. तहव्वूर यास अत्यंत कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. सुरक्षा कर्मचारी २४ तास पहारा देत आहेत. शिवाय, सीसीटीव्ही कॅमेर्‍याचीदेखील त्याच्यावर नजर आहे. तहव्वूर याने १३ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर २००८ दरम्यान पत्नी समराज राणा अख्तरसह उत्तर प्रदेशातील हापूर आणि आग्रा, दिल्ली, केरळमधील कोची, गुजरातमधील अहमदाबाद आणि महाराष्ट्रातील मुंबईला भेट दिली होती.
 
२६ नोव्हेंबर २००८ रोजी १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी सागरी मार्गाने मुंबईत घुसखोरी केली होती. रेल्वे स्टेशन, दोन हॉटेल्स आणि एका ज्यू केंद्रावर एकाचवेळी हल्ला केला होता. सुमारे ६० तास चाललेल्या या हल्ल्यात १६६ नागरिक ठार झाले होते. यामध्ये अमेरिका, ब्रिटन आणि इस्रायलमधील काही नागरिकांचा समावेश होता. या हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. दहशतवादी अजमल अमीर कसाबला जिवंत पकडण्यात आले. नोव्हेंबर २०१२ मध्ये कसाबला पुण्यातील येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली होती.
 

Related Articles