मागासवर्गीयांंना काँग्रेसकडून दुय्यम दर्जाची वागणूक   

पंतप्रधान मोदी यांची टीका 

हिसार :  सत्तेवर असताना काँग्रेसने अनुसूचित जाती, जमाती आणि मागासवर्गीयांना दुय्यम दर्जाच्या नागरिकांप्रमाणे वागणूक दिली, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केला. 
 
हरयानातील हिसार ते अयोध्या विमान सेवेचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. तसेच महाराज अग्रसेन विमानतळावर त्यांच्या हस्ते नवीन इमारतीची पायाभरणी देखील झाली. त्या प्रसंगी ते बोलत होते. मोदी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना उद्ध्वस्त करण्याचे काम काँग्रेसने केले. आंबेडकर यांनी समाजात समानता आणण्याचे कार्य केले. प्रत्येक गरीब व्यक्तीला आत्मसन्मानाने जगता यावे, त्यांंचे जीवनमान सुधारावे, त्यांची स्वप्ने पूर्ण व्हावीत, हा आंबेडकरांचा हेतु होता; काँग्रेसने मात्र, मतपेढीच्या राजकारणाचे विष समाजात पसरविले. मतपेढीच्या राजकारणाचा वापर केवळ सत्ता प्राप्त करण्यासाठी केला. काँग्रेसच्या राजवटीत नेतेमंडळी पोहण्याच्या तलावात डुंबत होती.
 
दुसरीकडे गावे पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेलीे होती.  ७० वर्षानंतरही केवळ १६ टक्के ग्रामस्थांना वाहिनीतून पिण्याचे पाणी मिळत होते. त्याचा सर्वाधिक फटका अनुसूचित जाती, जमाती आणि मागासवर्गीयांना बसला. काँग्रेसची नेतेमंडळी आता गरिबांच्या कल्याणासाठी आवाज उठवत आहेत. तशी भाषणे देत फिरत आहेत. मात्र, सत्तेवर असताना त्यांनी कधी अनुसूचित जाती, जमाती आणि मागासवर्गीयांपर्यत वाहिनीतून पाणी पोहोचविले आहे का ? आंबेडकर यांचा काँग्रेसने नेहमीच तिरस्कार केला. त्यांचा वारंवार अपमान केला. त्यामुळे त्यांचा एकदा नाही तर दोनदा निवडणुकीत पराभव झाला होता. यानंतर त्यांची सरकारमधून हकालपट्टी करण्याचे कारस्थान काँग्रेसने रचले होते. 

काँग्रेस मुस्लिम व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्ष का करत नाही?

काँग्रेसला कुणाचे भले झाले पाहिजे, असे कधीही वाटलेले नाही. मुस्लिमांचे भले करावे, असेही त्यांना वाटलेले नाही. काँग्रेसने मुस्लिमांच्या लांगुलचालनाचे राजकारण केले. काँग्रेसला मुस्लिमांबद्दल इतकेच प्रेम असेल तर एखाद्या मुस्लिम व्यक्तीला पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष का बनवत नाही? निवडणुकीत अर्ध्या जागा मुस्लिमांना का देत नाही? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला. काँग्रेसने तुष्टीकरणासाठी २०१३ मध्ये वक्फ कायद्यात सुधाणा केली होती, असेही ते म्हणाले.
 

Related Articles