मुर्शिदाबादमधून ५०० कुटुंबांचे पलायन   

कोलकाता : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर परिस्थिती अधिकच बिकट झाली  आहे. भीतीमुळे ५०० हून अधिक हिंदू कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत. बीएसएफवर गोळीबार, घरे जाळणे आणि मंदिरांची तोडफोड केल्याचा आरोप हिंसक जमावावर आहे. आतापर्यंत १५० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. भाजपने एनआयए चौकशीची आणि लष्कराचा विशेष कायदा लागू करण्याची मागणी केली आहे. 
 
बंगालच्या मुस्लिमबहुल मुर्शिदाबाद जिल्ह्यातील हिंसाचारानंतर तणाव निर्माण झाला आहे; परंतु तेथील हिंदू भीतीच्या छायेत आहेत. जिल्ह्यातील हिंसाचारामुळे प्रभावित सुमारे ५०० हिंदू कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत. त्यांनी भागीरथी नदी ओलांडून मालदा जिल्ह्यात आश्रय घेतला. कट्टरपंथीयांच्या भयामुळे त्यांना पळून जाण्यास भाग पाडले जात असल्याचा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी केला. अनेकजण झारखंडलाही गेले आहेत. तृणमूल काँग्रेसचे आमदार मनिरुल इस्लाम हेही फरक्का येथून पळून गेल्याचे वृत्त आहे. त्याचे घराला कुलूप आहे. दुसरीकडे, हिंसाचारग्रस्त शमशेरगंजमध्ये, बदमाशांनी पुन्हा बीएसएफ पथकावर गोळीबार केला आहे. हिंसाचारात दोन मुले जखमी झाली आहेत. गुन्हेगारांनी अनेक महिलांचा विनयभंग केल्याचाही आरोप आहे.

तलावात विष मिसळल्याने मासे मृत्युमुखी

धुलियान भागातील एका घरावर हल्ला करण्यासाठी साठवून ठेवलेले दगड बीएसएफने नुकतेच काढून टाकले. मुर्शिदाबादमध्ये सुमारे हिंदूंची  २०० घरे जाळण्यात आली. गॅस सिलिंडर उघडून त्यात पेट्रोल ओतल्यामुळे आग लागल्याचा आरोप नागरिकांनी केला. दंगलखोरांनी मोठ्या प्रमाणात घरे आणि दुकाने लुटली आणि आग लावली. अनेक तलावांमध्ये काही गुन्हेगारांनी विष मिसळल्यामुळे मोठ्या संख्येने मासे मृत्युमुखी पडले. सुपारीच्या बागांमध्येही त्यांनी जाळपोळ केली. 

एनआयएकडून चौकशी व्हावी

राज्य भाजपचे अध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी दावा केला की, दोन मंदिरांची तोडफोड जमावाने केली. या घटनेची चौकशी एनआयएकडे देण्याची मागणी करण्यात आली आहे. कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, केंद्रीय गृह मंत्रालयाने जिल्ह्यातील हिंसाचारग्रस्त आणि संवेदनशील भागात केंद्रीय दलांच्या १७ कंपन्या तैनात केल्या आहेत. यामध्ये बीएसएफच्या नऊ कंपन्या आणि सीआरपीएफच्या आठ कंपन्यांचा समावेश आहे. शनिवारी रात्रभर बीएसएफ जवानांनी सुती आणि शमसेरगंज पोलिस स्टेशन परिसरात गस्त घातली.
 

Related Articles