सलग पाच पराभवानंतर अखेर चैनईचा विजय   

लखनऊचा पाच गडी राखून केला पराभव 

लखनऊ : चेन्नई सुपर किंग्जने लखनऊ सुपर जायंट्सचा पाच विकेट्सने पराभव केला आहे. आयपीएल २०२५ मध्ये चेन्नईने सलग पाच पराभव स्वीकारल्यानंतर पहिला विजय मिळवला. लखनऊच्या एकना मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करत १६६ धावा केल्या, प्रत्युत्तरात चेन्नई संघाने शेवटच्या षटकात पाच विकेट्स राखून आपला विजय निश्‍चित केला. एमएस धोनीने ११ चेंडूत २६ धावांची तुफानी खेळी करत चेन्नईच्या विजयात मोठा वाटा उचलला.
 
१६७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात चांगली झाली. नवोदित शेख रशीद आणि रचिन रवींद्रने पाच षटके संपण्यापूर्वी चेन्नईला ५० धावांचा टप्पा ओलांडून दिला. रशीदने पदार्पणाच्या सामन्यात १९ चेंडूत २७ धावा केल्या. रचिन रवींद्रलाही आपल्या चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर करता आले नाही आणि अर्धवेळ गोलंदाज एडन मार्करामच्या चेंडूवर ३७ धावा काढून रवींद्र बाद झाला. राहुल त्रिपाठीचा खराब फॉर्म कायम असून, तो अवघ्या नऊ धावा करून बाद झाला. त्याच्यानंतर रवींद्र जडेजाही सात धावा करून झटपट बाद झाला. एकवेळ चेन्नईने एकही विकेट न गमावता ५२ धावा केल्या होत्या, पण पुढच्या ४४ धावांत चैन्नई संघाने चार महत्त्वाचे विकेट गमावल्या. चैनईने १११ धावांवर पाच  विकेट गमावल्या होत्या. यावेळी त्यांना विजयासाठी ३० चेंडूत ५६ धावांची गरज होती. शेवटच्या पाच षटकांमध्ये एमएस धोनी आणि शिवम दुबे यांनी नियंत्रित पद्धतीने फलंदाजी करत लखनऊच्या गोलंदाजांवर दबाव टाकत, ५७ धावांची नाबाद भागीदारी केली आणि चैनईचा विजय पक्का केला.

Related Articles