नवीन घरांच्या मागणीत घट   

वृत्तवेध 

या वर्षी जानेवारी ते मार्चदरम्यान, देशातील प्रमुख नऊ शहरांमधील निवासी मालमत्तांचा पुरवठा ३४ टक्क्यांनी घसरून ८०,७७४ युनिट्सवर आला. लोकांकडे गुंतवणुकीसाठी पैसा नसल्याने घरांच्या मागणीत घट झाली आहे. ‘प्रॉपइक्विटी’ने एका अहवालात ही माहिती दिली आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीमध्ये एक लाख २२ हजार ३६५ घरे उपलब्ध करण्यात आली होती. ‘रिअल इस्टेट डेटा’चे विश्लेषण करणार्‍या ‘प्रॉपइक्विटी’ या कंपनीच्या अहवालानुसार बंगळुरू वगळता सर्व बाजारपेठांमध्ये नवीन युनिट्सचा पुरवठा कमी झाला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, जानेवारी-मार्च तिमाहीमध्ये बंगळुरूमध्ये नवीन घरांचा पुरवठा १७ टक्क्यांनी वाढून २०,२२७ युनिट्सवर पोहोचला. तो मागील वर्षीच्या १७,३०३ युनिट्सपेक्षा जास्त होता. बंगळुरू वगळता सर्वत्र मागणी घटली.
 
दिल्ली-एनसीआरमध्ये नवीन घरांचा पुरवठा जानेवारी-मार्च २०२५ मध्ये १४ टक्क्यांनी घसरून १०,१०१ युनिट्सवर आला, जो एका वर्षापूर्वी याच कालावधीत ११,६९९ युनिट्स होता. चेन्नईमध्ये नवीन पुरवठा ७,२५९ युनिट्सवरून ४६ टक्क्यांनी घसरून ३,९४६ युनिट्सवर आला, तर हैदराबादमध्ये नवीन पुरवठा १४,०८२ युनिट्सवरून ३८ टक्क्यांनी घसरून ८,७७३ युनिट्सवर आला. कोलकात्यात नवीन पुरवठा ४,९६४ युनिट्सवरून ६२ टक्क्यांनी घसरून १,८७४ युनिट्सवर आला. मुंबईतील नवीन पुरवठा १२,८४० युनिट्सवरून ६,३५९ युनिट्सवर आला आहे. नवी मुंबईतही नवीन पुरवठा ६,६१६ युनिट्सवरून ५,८१० युनिट्सवर आल्याने २४ टक्के घट झाली आहे. पुण्यातील नवीन घरांचा पुरवठा २४ हजार सात युनिटवरून ४८ टक्क्यांनी घसरून १२ हजार ४७९ युनिट्सवर आला. ठाण्यात नवीन पुरवठा २२,५९५ युनिटवरून ५० टक्क्यांनी घसरून ११,२०५ युनिटवर आला.
 
‘एमव्हीएन इन्फ्रास्ट्रक्चर’चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक वरुण शर्मा यांनी या आकडेवारीबाबत सांगितले की दिल्ली-एनसीआर प्रदेशात नवीन युनिट्सच्या पुरवठ्यात झालेली घट खरेदीदारांच्या बदलत्या पसंतीनुसार विकासकांचे धोरणात्मक लक्ष प्रतिबिंबित करते. निवासी ब्रोकरेज फर्म ‘इनव्हेस्टोएक्सपर्ट’चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक विशाल रहेजा म्हणाले, की खरेदीदारांचे हित दिल्ली-एनसीआर मध्ये कायम आहे; परंतु मर्यादित नवीन ऑफर पुरवठ्यावर दबाव आणत आहेत. यामुळे उच्च मागणी असलेल्या सूक्ष्म बाजारपेठांमध्ये किमतीत वाढ होत आहे. ‘व्हीएस रिअल्टर्स’चे संस्थापक आणि ‘सीईओ विजय हर्ष झा म्हणाले की २०२३ च्या चौथ्या तिमाहीपासून एनसीआरमधील घरांचा हा सर्वात कमी तिमाही पुरवठा आहे. खरे तर, विकासक गेल्या वर्षी आलेल्या युनिट्सच्या किमती लक्षात घेऊन प्रतीक्षा करण्याचे धोरण अवलंबत आहेत.

Related Articles