काँग्रेस आमदार मीणा यांची भाजप नेत्याला मारहाण   

जयपूर : बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर नामफलक लावण्याच्या मुद्द्यावरून राजस्तानच्या बोनली शहरात स्थानिक काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये वाद झाला. याच वादातून काँग्रेसच्या बामनवासच्या आमदार इंदिरा मीणा यांनी भाजपचे मंडल अध्यक्ष हनुमंत दीक्षित यांना मारहाण केली. मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली. 
 
दोन वर्षांपूर्वी बोनली येथे आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते आणि त्याचे सुशोभीकरणाचे काम सुरू होते. रविवारी मीणा आणि इतर काही काँग्रेस कार्यकर्त्यांच्या नावाचा फलक या पुतळ्यावर लावण्यात आला. जेव्हा भाजप कार्यकर्त्यांना हे समजले, तेव्हा हनुमंत दीक्षित यांच्यासह प्रधान कृष्ण पोसवाल घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तो नामफलक काढून टाकला.  घटनेची माहिती मिळताच रात्री १२ च्या सुमारास इंदिरा मीणाही तेथे पोहचल्या. 
खाली पडलेला त्यांचा नाम फलक पाहून त्यांना राग अनावर झाला. हनुमान दीक्षित यांच्याशी त्यांनी वाद घातला.हा वाद टोकाला गेल्यानंतर इंदिरा मीणा यांनी हनुमंत दीक्षित यांच्या मोटारीवर  चढून त्यांना मारहाण केली. ‘भाजप है तो गुंडराज हो गया क्या’ असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Related Articles