उजनीत ६८ टीएमसी पाणी   

२५ मे नंतर धरणातील पाणी केवळ पिण्यासाठीच 

सोलापूर, (प्रतिनिधी) : सोलापूर जिल्ह्याच्या वरदायिनी उजनी धरणातून यंदा शेतीसाठी सलग दोन आवर्तने सोडल्याने तीव्र उन्हाळा असताना देखील शेतकर्‍यांना पाण्याची टंचाई जाणवली नाही. सध्या, कालवा, बोगदा, उपसा सिंचन योजना व भीमा नदीतूनही पाणी सोडण्यात आल्याने दररोज धरणातून एक टीएमसी पाणी कमी होत आहे.
 
सध्या उजनी धरणात एकूण ६८ टीएमसी पाणीसाठा असून, त्यात साडेचार टीएमसी (९ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. धरणातून सध्या कालव्यातून २९५० क्युसेक वेगाने नदीतून सहा हजार क्युसेक वेगाने, सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनांमधून ४१३ क्युसेक वेगाने आणि बोगद्यातून ७२० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. शेतीसाठी  दुसरे आवर्तन सोडण्यात आले असून ते २५ मे पर्यंत सुरू राहणार आहे. सध्या जिल्ह्यातील पावणेदोन लाख हेक्टर जमिनीला उजनीचे थेट पाणी पोहोचते. दुसरीकडे, बाष्पीभवन आणि बॅक वॉटरवरील कृषीपंप आणि धरणावरील ४२ पाणीपुरवठ्याच्या योजनांसाठी पाणी उपसा सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी दररोज एक टीएमसीने खालावत आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा धरणातील पाण्याची स्थिती चांगली असून पावसाळा सुरू होईपर्यंत (जुलै-ऑगस्टपर्यंत) पुरेल इतका पाणीसाठा धरणात आहे. तरीदेखील, २५ मे पासून धरणातील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवले जाणार आहे. 
 
सोलापूर शहरासाठी उजनी ते सोलापूर अशी समांतर जलवाहिनी टाकली आहे. पण, काम अजूनही १०० टक्के पूर्ण झालेले नाही. त्यामुळे चालू वर्षात सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून दोनदा धरणातील पाणी सोडण्यात आले आहे. अजूनही जूनच्या पहिल्या आठवड्यात सोलापूरसाठी भीमा नदीतून पाणी सोडावे लागणार आहे. मे अखेर धरणातील पाणी उणे २५ टक्क्यांपर्यंत पोचेल, असा अधिकार्‍यांचा अंदाज आहे. उणे २० टक्क्यानंतर कालव्यामधून शेतीसाठी पाणी सोडता येत नसल्याने २५ मे नंतर धरणातील पाणी फक्त पिण्यासाठीच असणार आहे.

पाणीसाठा

एकूण : ६८ टीएमसी
उपयुक्त :  ४.६३ टीएमसी
सध्या सोडलेले पाणी : १०,००० क्युसेक 
दररोज कमी होणारे पाणी : १ टीएमसी 
 

Related Articles