गाणगापूर-कुर्डूवाडी बसला आग   

इंजिनमध्ये बिघाड; प्रवासी बचावले  

सोलापूर, (प्रतिनिधी) : गाणगापूरहून कुर्डूवाडीला निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे आग लागली. सुदैवाने, सर्व ४० प्रवासी सुखरुप आहेत. पण, आगीत बस जळून भस्मसात झाली. ही दुर्घटना सोलापूर - अक्कलकोट मार्गावरील कुंभारी गावाजवळ सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारस घडली. 
 
इंजिनमधून धूर आणि आगीचे लोट बाहेर येत असल्याचे चालक प्रशांत पांचाळ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ बस थांबविली आणि बसमधील सर्व ४० प्रवाशांना बाहेर पडण्यास सांगितले. मात्र, अग्निशमन वाहन वेळेत न पोचल्यामुळे बस पूर्णपणे जळाली.  कुर्डूवाडी आगाराची ही बस गाणगापूरहून अक्कलकोट, सोलापूर मार्गे कुर्डूवाडीला निघाली होती. सर्व ४० प्रवासी सुखरूप आहेत. मात्र, बसचे नुकसान झाले आहे. दरम्यान, बस संपूर्ण जळून खाक झाली तरी सोलापुरातील राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकार्‍यांना याची माहिती मिळालेली नव्हती.
 
दरम्यान, सोलापूर - अक्कलकोट रस्ता वाहनांसाठी काही वेळ बंद करण्यात आला होता. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आजूबाजूंनी जाणार्‍या वाहनांना एसटीच्या आगीची झळ पोहचू नये म्हणून विशेष खबरदारी घेण्यात आली होती.एसटी महामंडळच्या दुसर्‍या वाहनातून प्रवाशांना सोडण्यात आले. आग इतकी भीषण होती की, काही वेळातच बस जळून खाक झाली. बसचा फक्त सांगाडाच दिसत होता. 
 

Related Articles