राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज   

पुणे : राज्यात ठिकठिकाणी पावसाला पोषक स्थिती कायम आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस राज्यात ठिकठिकाणी मेघगर्जना, वीजांच्या कडकडाटात हलका ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसाला सुरूवात झाल्यानंतर अनेक भागात सोसाट्याचा वाराही वाहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने सोमवारी वर्तविला आहे. 
 
वार्‍याची द्रोणीय रेषा विदर्भ व मराठवाडा मार्गे जात आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात आज (मंगळवारी) पासून पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. काल मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. 
 
सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर आणि धाराशिव येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना व वीजांच्या कडकडाटात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. यावेळी सोसाट्याचा वाराही वाहणार आहे. विदर्भात भंडारा, गडचिरोली, गोंदिया येथे पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे. त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना यलो अलॅर्ट देण्यात आला आहे. ढगाळ वातावरणामुळे पुढील २४ तासात राज्यातील तपमानात फार मोठा बदल होणार नसल्याचा अंदाज आहे.
 
दरम्यान, पुणे शहर आणि परिसरात सकाळपासून दुपारपर्यंत ऊन कायम असणार आहे. दुपारनंतर आकाश ढगाळ होणार आहे. तसेच पुढील दोन दिवस सायंकाळी मेघगर्जनाही होणार आहे. दुपारपर्यंत मात्र ऊन्हाचा कडाका कायम राहिल. त्यामुळे ऊन आणि उकाडाही कायम आहे. वाढलेल्या ऊन्हामुळे पुणेकरांना दिवसभर उकाडा सहन करावा लागत आहे. त्यामुळे दुपारी घराबाहेर पडण्याआधी लोकांना ऊन्हाचा विचार करावा लागत आहे.  
 
पुण्यातील कमाल तपमान
 
ठिकाण कमाल 
लोहगाव          ४१.८ अंश
शिवाजीनगर ३९.२ अंश
पाषाण ३९.२ अंश
मगरपट्टा ३८.९ अंश   
 

Related Articles