माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंचे राहुरीत उपोषण   

महापुरुष पुतळा विटंबनेतील आरोपींना अटक करण्याची मागणी

राहुरी (वार्ताहर) : येथे महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना होवून २० दिवसांचा कालावधी उलटला तरी अद्याप आरोपी पकडण्यात आलेले नाहीत. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास करणे गरजेचे होते. यातील आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी ४ दिवसापूर्वी पोलिांना निवेदन दिले होते. विविध ठिकाणी विटंबनेच्या घटना घडत असतानाही तपास मात्र तडीला जात नाही, ही खेदाची बाब आहे. शासनाने हा विषय फारसा गांभीर्याने घेतला नसल्यामुळे उपोषण हाती घ्यावी लागले ही दुर्दैवाची बाब असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.
 
तनपुरे यांनी काल (सोमवारी) शनि चौकात आमरण उपोषणास प्रारंभ केला त्यावेळी ते बोलत होते. शहरात एवढी मोठी घटना घडली असताना नागरिकांनी संयम ठेवत पोलिसांवर जबाबदारी सोपवली. परंतु तपासात फारशी प्रगती झालेली नाही. बंद ठेवून, रास्ता रोको करून सर्वसामान्यांना त्रास होतो त्याऐवजी आता आत्मक्लेश आंदोलन करावे लागत आहे. २ दिवस राहुरी बंद होती. तालुक्यातील विविध गावांनीही बंद ठेवून घटनेचा निषेध केला. परंतु तपासात कोणतीही प्रगती दिसली नाही. 
 
हे प्रकरण विसरण्यासारखे नाही. केवळ तपास चालू आहे, या सबबीखाली वेळकाढूपणा चालल्याचे दिसत आहे. आमदारांनाही केवळ प्रसिध्दीमाध्यमांवर व्हीडिओ प्रसारित करण्याची हौस दिसते. आरोपी कोणत्याही समाजाचा असो तो जनतेसमोर आणून त्यास कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी सर्वांचीच मागणी आहे. या मागणीचा विचार करून पोलिसांनी आता जनतेचा अंत न पाहता तातडीने तपास करून आरोपींना अटक करण्याची गरज असल्याचे तनपुरे यांनी स्पष्ट केले. उपोषणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, रिपब्लिकन पक्ष, प्रहार संघटना, तुळजाभवानी सेवा ट्रस्ट, निळं वादळ युवा प्रतिष्ठान, सत्यशोधक लहुजी क्रांती सेना, अखिल भारतीय क्रांती सेनेसह विविध संघटना सहभागी झाल्या आहेत. माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी उपोषणस्थळी भेट देवून पाठिंबा दिला. 
 

Related Articles