अवकाळी पावसामुळे हिरडा, आंबा, करवंदाचे नुकसान   

मंचर, (प्रतिनिधी) : भीमाशंकर परिसरामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आदिवासी भागातील हिरडा, आंबा, करवंदे या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच जनावरांचा चाराही भिजून गेल्याने पुढील काळामध्ये चार्‍याची टंचाई भासणार आहे.
 
पश्चिम आदिवासी भागामध्ये रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने आदिवासी भाग झोडपुन काढला तर सुसाट वारा, गारांचा पाऊस असा सुमारे दोन तास झालेल्या या पावसामुळे आदिवासी भागात असणारे उत्पन्नाचे साधन देणारे एकमेव हिरडा झाडांचा बार व छोटे कळी हिरडा तसेच आंबा व करवंदे पावसाने झोडपुन काढले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर जनावरांचा चारा, गवत, भाताचा पेंढा भिजून गेल्याने पुढील काळामध्ये चारा टंचाईचे संकट उभे राहणार आहे. 
 
अवकाळी पावसामुळे भीमाशंकर, कोढवळ, निगडाळे, तळेघर, राजपुर, पिंपरी, पाटण, कुशिरे, आहुपे, डोण, तिरपाड, आघाणे, पिंपरगणे, न्हावेड, नानवडे, जांभोरी, सावरलीसह परिसर झोडपुन काढला होता. सध्या आदिवासी भागांमध्ये हिरडा झाडांना हिरड्या येण्यास सुरुवात झाली असून काही झाडांना हिरडा हा कळीच्या स्वरूपात आहे. तर काही झाडांना बार आलेला आहे. अवकाळी पावसामुळे या हिरडा झाडावरील कळी व बार वारामोडीने गारपिटी व जोरदार पावसाने गळून पडला आहे. यामुळे आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. या हिरडा उत्पन्नावर आदिवासी बांधवांची दैनंदिन जीवनमान अवलंबून असते. परंतु याच उत्पन्नाच्या साधनावर अचानक आलेल्या अवकाळी पावसाने घाला घातल्याने आदिवासी शेतकरी हा हवालदिल झाला आहे. हिरडा पीक, आंबा व भिजलेला चारा याचे पंचनामे करावेत. अशी मागणी शरद बँकेचे संचालक मारुती लोहकरे, कोंढवळ ग्रामपंचायत सदस्या सविता दाते, खरेदी विक्री संघाचे संचालक शामराव बांबळे यांनी केली आहे.
 

Related Articles