अरबी समुद्रात सापडले १८०० कोटींचे अमली पदार्थ   

अहमदाबाद : गुजरात दहशतवाद विरोधी पथक आणि तटरक्षक दलाने १,८०० कोटीचे ३०० किलो अमली पदार्थ गुजरातच्या समुद्रात जप्त केले. भारतीय तटरक्षक दल (आयसीजी) व गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ही कारवाई केली. यामध्ये मेथामफेटामाइन नावाचे अमली पदार्थ असल्याचा संशय आहे. अमली पदार्थाचा साठा एटीएसकडे सोपविण्यात आला आहे, असे भारतीय तटरक्षक दलाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.एटीएस आणि तटरक्षक दलाने १२ आणि १३ एप्रिलच्या मध्यरात्री गुजरातमधील अरबी समुद्रात आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेजवळ संयुक्त कारवाई केली.      
 
अंमली पदार्थांची तस्करी करणारी आंतरराष्ट्रीय टोळी तटरक्षक दलाच्या हातून निसटली असली तरी त्यांनी अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे.
या बोटीवरील टोळीने भारतीय तटरक्षक दलाचे जहाज त्यांच्या जवळ येत असल्याचे पाहिले आणि त्यांनी त्यांच्याजवळील अंमली पदार्थांचा साठा समुद्रात फेकून दिला. तसेच बोट घेऊन ते सागरी सीमेच्या दिशेने निघाले. त्यांना भारताची सागरी सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करायचा होता. मात्र, तटरक्षक दलाने त्यांची छोटी नाव समुद्रात उतरवली. त्या नावेवरील कर्मचार्‍यांनी टोळीने समुद्राच्या पाण्यात फेकून दिलेले अंमली पदार्थ शोधले आणि जप्त केले. तर, आयसीजीच्या जहाजाने तस्करांच्या बोटीचा पाठलाग केला. मात्र, टोळींची बोट सागरी सीमा पार करून निघून गेली. त्यामुळे तरक्षक दलाला पाठलाग थांबवावा लागला. हे अंमली पदार्थ तपासणी करण्यासाठी पोरबंदर येथे आणण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांमधील आयसीजी व गुजरात एटीएसची ही १३ वी मोठी व यशस्वी कारवाई आहे. या कारवाईमुळे राष्ट्रीय सुरक्षा व सुरक्षेसाठी तैनात संस्थांमधील मजबूत भागीदारी सिद्ध होत आहे.
 

Related Articles