मध्य प्रदेशात जैन मुनींवर हल्ला   

राजस्तानातील सहा आरोपींना अटक

भोपाळ : मध्य प्रदेशच्या नीमच जिल्ह्यातील सिंगोली पोलिस ठाण्याच्या परिसरात सहा दरोडेखोरांनी तीन जैन मुनींवर काठ्या आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यात जैन मुनी जखमी झाले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी शहर बंद ठेवण्यात आले होते.गणपत राजू नायक, गोपाल भगवान, कन्हैयालाल बनशीलाल, राजू भगवान  बाबू मोहन शर्मा आणि एका अल्पवयीन दरोडेखोराला अटक करण्यात आली. हे सर्वजण राजस्तानातील चित्तोडगडचे रहिवासी आहेत. 
 
रविवारी रात्री जैन मुनी सिंगोली रोडवरील हनुमान मंदिरात विश्रांतीसाठी थांबले होते. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास सहा दरोडेखोर तीन दुचाकीवरून तिथे पोहोचले. आरोपींनी मंदिरासमोर बसून दारू प्यायली. नंतर त्यांना एक मुनी दिसले. त्यांच्याकडे त्यांनी पैशांची मागणी केली. मुनींनी नकार दिल्यानंतर  दरोड्याच्या उद्देशाने काठ्या आणि धारदार शस्त्रांनी सहा जणांनी तिन्ही मुनींवर  हल्ला केला.त्यावेळी जीव वाचवण्यासाठी एक जैन साधू रस्त्याकडे धावला. त्याने एका दुचाकीस्वाराची मदत मागितली. दुचाकीस्वाराने जैन समाजातील काही नागरिकांना बोलावून घेतले. लोकांना येताना पाहून चार दरोडेखोर पळून गेले, तर दोघांना नागरिकांनी पकडले. काही वेळातच पोलिसही पोहोचले. पोलिसांनी ६ आरोपींना अटक केली आहे.दरम्यान, हल्ल्यात जखमी झालेल्या मुनींनी रुग्णालयात जाण्यास नकार दिला. त्या सर्वांना जैन स्थानक भवनात ठेवण्यात आले आहे. या घटनेनंतर जैन समाजाने सोमवारी शहर बंदची हाक दिली होती.
 

Related Articles