ससूनच्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीची आज बैठक   

दीनानाथ रुग्णालयातील गर्भवती माता मृत्यू प्रकरण

पुणे : गर्भवती तनिषा भिसे यांचा मृत्यू हा वैद्यकीय निष्काळजीपणामुळे झाला आहे का? याची शहानिशा करण्यासाठी आज (मंगळवारी) ससूनच्या वैद्यकीय तज्ञांच्या समितीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मृत्यूप्रकरणी कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. या समितीमध्ये भिसे यांच्या मृत्यूची जबाबदारी नेमकी कोणाची यावर देखील चर्चा होईल. समितीच्या निष्कर्षाचा अहवाल अलंकार पोलिसांकडे दिला जाणार आहे. त्यानुसार पोलिसांच्या कारवाईची पुढील दिशा ठरु शकते. 
 
तनिषा भिसे यांच्या कुटूमबाला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने अनामत रक्कम मागितली. उपचार नाकारल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांडून केला जात आहे. नातेवाईकांनी त्याबाबत अलंकार पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी त्यांचे जवाब नोंदवले आहेत. अलंकार पोलिसांनी भिसे कुटुंबियासह दिनानाथ मंगेशकर रुग्णालय, सूर्या रुग्णालय, मनीपाल रुग्णालय आणि इंद्रा आयव्हीएस फर्टिलिटी सेंटर या सर्व ठिकाणांची तपासणी केली आहे.  संबंधितांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. पोलिसांनी सर्व रुग्णालयांमध्ये डॉक्टर आणि कर्मचार्‍यांच्या जबाब सीसीटीव्ही चित्रण ताब्यात घेतले आहे. 
 
भिसे यांच्या मृत्यूबाबत अगोदरच तीन समित्यांनी चौकशी अहवाल दिला आहे. यामध्ये आरोग्य विभागाचे समिती, धर्मदाय सहआयुक्त समिती आणि माता मृत्यू अन्वेषण समितीचा समावेश आहे. या तिन्ही समित्यांचे अहवाल शासनासला सादर करण्यात आले आहेत. त्यातच आता ससूनच्या समितीचा अहवाल देखील महत्त्वाचा ठरणार आहे. ससून मधील वैद्यकीय तज्ञांच्या समितीचे आज बैठक होईल. यामध्ये भिसे प्रकरणातील सर्व कागदपत्रे समितीकडून तपासली जातील. त्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास उर्वरित कागदपत्रे मागवली जातील. समितीमध्ये ससून वैद्यकीय अधीक्षकांसह स्त्री रोग विभाग प्रमुख, औषध शास्त्र विभाग प्रमुख, न्यायवैदिक शास्त्र विभाग प्रमुख, भूलशास्त्र विभाग प्रमुख बालरोग तज्ञ विभाग प्रमुख, अशा सहा जणांचा समावेश आहे.
 

Related Articles