दोषींवर कारवाई होणारच : चाकणकर   

दीनानाथ रुग्णालयातील गर्भवती माता मृत्यू प्रकरण

पुणे : दीनानाथ रूग्णालयातमध्ये भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांचा प्रसूतीवेळी मृत्यू झाला. याप्रकरणी, राज्य सरकाराने चौकशी समिती गठीत केली असून काही अहवाल प्राप्त झाले आहेत. गर्भवती माता मृत्यूप्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई होईल असा विश्वास राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केला. ससून रुग्णालयाचा अहवाल आल्यानंतर संबधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल असे त्यांनी सांगितले.
 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर चाकणकर यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. दीनानाथ प्रकरणाची महिला आयोगाने तत्काळ दखल घेतली. महापालिका आयुक्त, पोलिस यांना सुचना दिल्या. त्याच दिवशी सायंकाळी भिसे कुटुंबांकडून अलंकार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली. आता ससून रुग्णालयाचा या प्रकरणाचा अहवाल येणे बाकी आहे, तो मंगळवारी येणे अपेक्षित आहे, त्यानंतर या विषयावर सविस्तर माहिती दिली जाईल असे चाकणकर यांनी सांगितले.
 
महिला आयोग पहिल्या दिवसापासून सातत्याने याचा पाठपुरावा करत आहे. आता माता मृत्यू समितीचा अहवाल, धर्मादाय आयुक्तांचा अहवाल मंत्रालयात सादर केला आहे. ससून रुग्णालयाचा अहवाल मंगळवारी मिळेल. यातून या प्रकरणाशी संबधित सर्वच गोष्टींवर प्रकाश पडणे अपेक्षित आहे. त्यानंतर, लगेचच यासंबंधी पुढील कार्यवाही होईल. यापुढे कोणतीही तनिषा भिसे ठरू नये या निर्धाराने आयोग काम करत असल्याचे चाकणकर यांनी सांगितले.
 
डॉ. घैसास यांना दिलेली नोटीस, रुग्णालय प्रशासनाने त्यांच्यावर केलेली कारवाई याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. महाराष्ट्र मेडिकल कौन्सील यांना याबाबत आम्ही विचारणा केलेली आहे. या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल आल्यानंतरच बोलता येईल असे चाकणकर म्हणाल्या. 
 

Related Articles