शुल्कामुळे तुमचाच खिसा रिकामा होणार   

चीनचा अमेरिकन नागरिकांना इशारा

बीजिंग : अमेरिका आणि चीन यांच्यातील वाढत्या व्यापारयुद्धाच्या पार्श्वभूमीवर बीजिंगने आपल्या धोरणात मोठा बदल करत, ट्रम्प प्रशासनाला लक्ष्य करण्याऐवजी थेट अमेरिकन जनतेला उद्देशून संदेश देण्यास सुरुवात केली आहे. चीनने अमेरिकन नागरिकांसाठी दिलेल्या संदेशात म्हटले आहे, की ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणांचा फटका परदेशी अर्थव्यवस्थांना नाही, तर अमेरिकन नागरिकांनाच बसत आहे, असा दावा चीनने केला आहे.
 
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी द समाज माध्यमावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक अमेरिकन आयातदार असलेली व्यक्ती दाखवलेली असून, ती अमेरिकन जनतेला विशेषतः ट्रम्प समर्थकांना उद्देशून म्हणते, की ट्रम्प यांच्या आक्रमक व्यापारधोरणांचा सर्वात मोठा आर्थिक फटका सामान्य नागरिकांवर बसणार आहे. या धोरणांमुळे आयात वस्तू महाग होतील आणि ग्राहकांवर त्याचा भार पडेल.माओ यांनी कॅप्शनमध्ये म्हणले आहे, की परदेशी देश टॅरिफ भरतात का? नाही अमेरिकन व्यवसायिक हे पैसे भरतात आणि नंतर तो खर्च तुमच्यावर ढकलतात. टॅरिफमुळे उत्पादकता परत येत नाही. ते फक्त अमेरिकन नागरिकांवर लादलेले एक शुल्क आहे.
 
अमेरिका-चीन व्यापारयुद्ध
 
ट्रम्प यांनी चीनवर लावलेल्या आयात करामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव  वाढला आहे. ट्रम्प यांनी प्रतिपूर्ती टॅरिफ असे सांगत चीनच्या वस्तूंवर १४५ टक्के आयात शुल्क लावले आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकन वस्तूंवर १२५ टक्क्यांपर्यंत शुल्क वाढवले आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि चीनच्या या परस्पर शुल्कवाढीमुळे दोन्ही देशांमधील सुमारे ६५० अब्ज डॉलर्सच्या व्यापार धोक्यात येण्याची शक्यता आहे.ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, की आम्ही आमचे म्हणणे लादू शकतो, पण आम्ही न्याय वागण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही शुल्क लावू शकतो आणि ते आमच्यासोबत व्यापार न करण्याचा किंवा शुल्क भरून व्यापार करण्याचा निर्णय घेऊ शकतात.
 
वाटाघाटी शक्य, पण माघार नाही : ट्रम्प
 
ट्रम्प यांनी स्पष्ट केले, की त्यांना चीनवर लावलेल्या शुल्काबाबत कोणतीही अडचण नाही. त्यांनी सांगितले, की बीजिंगसोबत करार करण्यास तयार आहे.  त्यानंतर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी त्यांचे कौतुकही केले. मात्र सध्या तरी दोन्ही देश माघार घेण्यास तयार नाही. 

Related Articles