गाझामधील रुग्णालयावर इस्रायलचे हल्ले   

दीर अल-बलाह (गाझा) : गाझामधील एका रुग्णालयावर इस्रायलकडून रविवारी  हल्ले करण्यात आले. या हल्ल्यामुळे रुग्णांना रुग्णालय सोडावे लागले. हा हल्ला गाझा शहरातील अल-अहली रुग्णालयावर करण्यात आला, इस्रायल सैन्याकडून याला हमास दहशतवाद्यांचे लपण्याचा ठिकाण असल्याचे सांगण्यात आले आहे.या हल्ल्याची माहिती देताना गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले, की रुग्णालयावर हा हल्ला पहाटेच्या सुमारास झाला. हल्ल्यानंतर रुग्ण आणि रुग्णालयातील कर्मचार्‍यांना तेथून लगेच बाहेर काढण्यात आले. तातडीने उपचार न मिळाल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाला.
 
इस्रायलने दिला होता इशारा
 
अल-अहली रुग्णालयाचे संचालक डॉ. फदेल नैम म्हणाले, या हल्ल्याची पूर्व सूचना मिळाली होती. या हल्ल्यात आपत्कालीन कक्ष, फार्मसी आणि इतर इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. १०० हून अधिक रुग्ण आणि  वैद्यकीय कर्मचारी यामध्ये बाधित झाले आहेत. इस्रायलनेही हल्ल्याबाबत एक निवेदन जारी केले, ज्यामध्ये म्हटले आहे, की हल्ल्यापूर्वी नागरिकांना इशारा देण्यात आला होता. नुकसान कमी करण्यासाठी अचूक शस्त्रे आणि हवाई देखरेखीचा वापर करण्यात आला.
 
हल्ल्यात सात जणांचा मृत्यू
 
दुसरीकडे, या हल्ल्याच्या काही तासांनंतर, मध्य गाझाच्या देईर अल-बलाह भागात झालेल्या वेगळ्या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला. याबाबत इस्रायलने दावा केला, की रुग्णालयात हमासचे कमांड सेंटर होते, जिथून इस्रायली नागरिक आणि सैनिकांवर हल्ल्यांचे नियोजन केले जात होते.

Related Articles