रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात कीव्हमधील भारतीय औषध कंपनीचे गोदाम उद्ध्वस्त   

कीव्ह : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनची राजधानी कीव्हमधील भारतीय औषध कंपनी ’कुसुम’ चे गोदाम उद्ध्वस्त झाले, असा दावा भारतातील युक्रेन दूतावासाने शनिवारी केला. भारताशी मैत्री असताना रशियाने मुद्दाम भारतीय व्यवसायांना लक्ष्य केल्याचा आरोप ही युक्रेनने केला आहे.
 
याबाबत भारत आणि रशिया सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. रशियन क्षेपणास्त्राने युक्रेनमधील भारतीय औषध कंपनी ’कुसुम’च्या गोदामावर हल्ला केला. भारताशी मैत्री असल्याचे म्हणत रशिया भारतीय व्यावसायिकांना मुद्दाम लक्ष्य करत आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली औषधे नष्ट झाली आहेत, अशी माहिती युक्रेनच्या दूतावासाने समाज माध्यमावर दिली आहे.
 
यूकेच्या राजदूतांनी शेअर केले छायाचित्र
 
याच हल्ल्यावर यूकेचे युक्रेनमधील राजदूत मार्टिन हॅरिस यांनीही प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी सांगितले, की कीव्हमधील एका मोठ्या औषध गोदामावर रशियन ड्रोनने हल्ला केला. मात्र, त्यांनी त्यामध्ये गोदामाचे नाव सांगितलेले नाही. रविवारी सकाळी, रशियन ड्रोनने कीव्हमधील एका मोठ्या औषध गोदामावर हल्ला केला. औषधांचा संपूर्ण साठा जळून खाक झाला. रशियाचा नागरिकांवर दहशतीचा डाव सुरूच आहे, असे हॅरिस यांनी समाज माध्यमावर म्हटले आहे. तसेच, त्यांनी एक फोटोही शेअर केला आहे.

Related Articles