लेझरच्या वापराने क्षेपणास्र नष्ट करण्याचे तंत्रज्ञान विकसित   

कर्नुल : लेझर किरणांचा वापर करुन लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन नष्ट करण्याचे तंत्रज्ञान भारताने विकसित केले आहे. त्यामुळे अशा प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करणार्‍या देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे. अशा प्रकारचे तंत्रज्ञान अमेरिका, चीन आणि रशियाकडे आहे. त्यामुळे संरक्षणात लेझर तंत्रज्ञान विकसित करणारा भारत चौथा देश बनला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओच्या पुढाकाराने लेझर आधारीत तंत्रज्ञानाचा विकास केला आहे. ३० किलोवॅट क्षमतेची लेझर शस्त्र यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. त्याची आंध्र प्रदेशातील कर्नुल येथे चाचणी घेण्यात आली. या शस्त्राची निर्मिती करुन ते विविध लष्करी ठिकाणांवर तैनात केले जातील. 
 
डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्हि कामत यांनी सांगितले की, लेझरवरील शस्त्र निर्मिती करण्याची सुरूवात आहे. डीआरडीओ प्रयोगशाळा, कारखाने आणि शैक्षणिक संंस्थाच्या सहकार्याने या क्षेत्रात भारत झेप घेणार आहे. सूक्ष्म लहरी, विद्युत चुंबकीय तंत्रज्ञानाचा वापर करुन भविष्यातील स्टार वॉरसारखे तंत्रज्ञान विकसित करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. माझ्या माहितीनुसार या त्रेत्रात अमेरिका, रशिया आणि चीनचा दबदबा आहे. इस्रायल देखील तंत्रज्ञान विकसित करण्यात गुंतला आहे. त्यामुळे भारत या क्षेत्रातील चौथा किंवा पाचवा देश असू शकतो. 
 
३० किलोवॅट क्षमतेची लेझर शस्त्र यंत्रणा ५ किलोमीटरपर्यंत उडणारी विमाने, ड्रोन, हेलिकॉप्टर किंवा क्षेपणास्त्रांचा वेध घेऊ शकते. भविष्यातील  इलेक्ट्रॉनिक युद्ध क्षमतेचा विचार केला जात आहे. त्यात संपर्क यंत्रणा किंवा उपग्रहांचे संदेश निष्क्रिय करण्याचे सामर्थ्य प्राप्त करण्यात येणार आहे.  आकाश, पाणी आणि हवेतून हवेत यंंत्रणेचा वापर भविष्यात केला जाणार आहे. सेंटर फॉर हाय एनर्जी अँड सायन्सचे संचालक डॉ. जगन्नाथ नाईक यांनी सांगितले की, यंत्रणेचा वापर करुन विमानाच्या पंख नष्ट केले आहेत. तसेच ड्रोनवर तिचा वापर यशस्वीपणे करण्यात यश मिळविले आहे. एकाच वेळी अनेक लक्ष्यांचा भेद करण्याचे सामर्थ्य प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

Related Articles