विद्यार्थ्यांना द्यायला लावल्या ’जय श्री राम’च्या घोषणा   

तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन.रवी पुन्हा वादात

चेन्नई : तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन.रवी पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. मदुराई येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना संबोधित करत असताना त्यांनी जय श्री रामच्या घोषणा देण्यास सांगितले. कंब रामायण लिहिणार्‍या कवीचा उल्लेख करत असताना त्या कवीच्या सन्मानार्थ विद्यार्थ्यांनी जय श्री राम म्हणावे, असे आवाहन राज्यपालांनी केले.राज्यपालांच्या आवाहनाचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यामुळे राज्यपालांवर द्रमुकच्या नेत्यांकडून टीका होऊ लागली आहे.  आपण प्रभू श्रीरामाच्या महान भक्ताला वंदन करुयात आणि त्यांच्या सन्मानार्थ जय श्री रामच्या घोषणा देऊयात, असे राज्यपालांनी म्हटले होते. राज्यपाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते असल्याप्रमाणे वागत आहेत, अशी टीका द्रमुकच्या नेत्यांनी केली.
 
राज्यपालांची कृती धर्मनिरपेक्ष विचारांच्या विरोधात  
 
• द्रमुक पक्षाचे प्रवक्ते धरणीधरन म्हणाले, राज्यपालांची ही कृती देशाच्या धर्मनिरपेक्ष विचारांच्या विरोधात आहे. राज्यपाल वारंवार घटनेचे उल्लंघन का करत आहेत? त्यांनी अद्याप राजीनामा का दिला नाही? राज्यपालांनी देशाच्या संघ राज्य रचनेचे उल्लंघन केले असून त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच त्यांची कानउघाडणी केली.

Related Articles