पश्चिम बंगालमधील चार जिल्ह्यांत लष्कराचा विशेष कायदा लागू करा   

ज्योतिर्मय सिंह यांची मागणी 

कोलकाता : पश्चिम बंगालमधील चार सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये लष्कराचा विशेष कायदा लागू करा, अशी मागणी पुरुलियातील भाजप खासदार ज्योतिर्मय सिंह महतो यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून केली. पत्रात महतो यांनी आरोप केला आहे की, मुर्शिदाबाद, मालदा, नादिया आणि दक्षिण २४ परगणा या जिल्ह्यांमध्ये हिंदूंविरुद्ध हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत; परंतु राज्यातील तृणमूल काँग्रेस सरकारने तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे डोळेझाक केली आहे. अलीकडेच मुर्शिदाबाद जिल्ह्यात हिंदूंची ८६ हून अधिक घरे आणि दुकाने लुटली गेली. हरगोबिंदो दास आणि त्यांच्या मुलासह काही नागरिकही मारले गेले.
 
झाबोना गावात सुपारीच्या बागांना आग लावण्यात आली. सीमावर्ती जिल्ह्यांमध्येही अशीच अशांतता पसरत आहे. वक्फ दुरूस्ती कायद्याच्या विरोधात जमावाने हिंदूंच्या घरांवर, सार्वजनिक मालमत्तेवर आणि अगदी पोलिस दलांवर हल्ले केले. कोलकाता उच्च न्यायालयाला हस्तक्षेप करून केंद्रीय सशस्त्र पोलिस दल तैनात करण्याचे आदेश द्यावे लागले. यावेळी राज्याचे प्रशासकीय अपयश उघड झाले. सीमावर्ती भागातील चार जिल्हे अशांत क्षेत्र घोषित केल्यास  भविष्यातील हिंसाचार टाळता येईल. राणाघाटचे भाजप खासदार जगन्नाथ सरकार यांनीही शहा यांना पत्र लिहून पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती ढासळत असताना तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

Related Articles