सोन्यातील गुंतवणूक तारणार का?   

अभिजित अकोळकर 

जागतिक व्यापार युद्धाचा भडका उडाला आहे. शेअर बाजारातील अस्थिरता पाहता सुरक्षित गुंतवणूक म्हणून मौल्यवान धातुकडे पाहिले जाते. त्यापैकी सोने एक आहे. गोल्ड  ईटीएफमधील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. पण, सोन्यातील गुंतवणूक तारणार का ? हा   प्रश्न सामान्य ग्राहकांना पडला आहे. हजाराचे बारा लाख की लाखाचे बारा हजार होणार ते काळ ठरविणार आहे. 
 
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे वर्तन पाहता ते कधी आणि कोणता निर्णय घेतील हे सांगता येत नाही. वाढीव आयात शुल्क झटपट लागू केले आणि आता एक पाऊल मागे घेत ते मागे घेतले.  ९० दिवसासाठी काही देशांना दिलासा दिला. आणि क्षणात चित्र बदलले. सोन्याचे दर कोसळणार, किंमती ३८% ने घसरू शकतात, अशी चर्चा सुरू झाली. सध्या देशातील सराफा बाजारात सोन्याचा भाव ९६,४०० रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या वर आहे.  अमेरिकन तज्ज्ञाच्या मते, भारतात २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ५६ हजार रुपयांपेक्षा कमी होऊ शकते. त्यासाठी  कारणे दिली आहेत. यामुळे गुंतवणूक दरामध्ये चलबिचल झाली. अनेक ठिकाणी सोने विक्रीसाठी त्यांनी  रांगा लावल्याचे दिसून आले. आता सोन्याचे दर विक्रमी उच्चांकावर पोहोचल्यामुळे गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे. परंतु दर कधी वाढतात आणि घसरत जातात. त्याचा फटका सामान्य ग्राहकाना बसतो.  सोन्याच्या किमतीतील चढउतार भविष्यातही सुरू राहणार का ? हा  प्रश्न आहे.
 
पुरवठा वाढला 
 
सोने दर घसरण्याची कारणे अनेक असून पुरवठ्यात वाढ ते त्यापैकी एक आहे. जागतिक पातळीवर उत्पादन वाढले आहे. यामुळे सोन्याचा साठा ९ टक्केने वाढून २लाख १६ हजार २६५ टन झाला आहे. खाणकाम वाढले असून विक्री झाल्याने जुने सोने बाजारात परत येत आहे.  पुरवठा वाढला आहे.
मागणी घटली गेल्या वर्षी मध्यवर्ती बँकांनी १ हजार ४५ टन सोने खरेदी केले होते. परंतु भविष्यात खरेदी कमी होऊ शकते. एका पाहणीनुसार, ७१ टक्के केंद्रीय बँका  सोन्याच्या खरेदीत कपात करतील किंवा स्थिर ठेवतील.
 
गोल्ड-ईटीएफ
 
चोख सोने खरेदी करण्यापेक्षा  गोल्ड-ईटीएफमधील गुंतवणूक करण्याकडे कल वाढू शकतो. कारण ते आभासी सोने आहे. कागदोपत्री सोन्यात गुंतवणूक करून   पैसे सुरक्षित ठेवण्याचा तो एक मार्ग आहे. अशी गुंतवणूक वाढली तर चोख सोन्याचे दर आणखी कमी होण्याची  शक्यता अधिक आहे. गोल्ड ईटीएफने पाच वर्षांत दहा हजार  रुपयांच्या मासिक एसआयपीचे  रूपांतर नऊ लाख रुपयांपेक्षा जास्त केले.एसआयपीतून  सरासरी १७  टक्के  परतावा देणार्‍यामध्ये  एलआयसी एमएफ  गोल्ड ईटीएफ, एचडीएफसी गोल्ड ईटीएफ, अ‍ॅक्सिस गोल्ड ईटीएफ,  आदित्य बिर्ला एसएल गोल्ड ईटीएफ , कोटक गोल्ड ईटीएफ, क्वांटम गोल्ड फंड ईटीएफ यांचा समावेश आहे. 
 
अफवेमुळे सोने मोडीत काढण्यासाठी गर्दी  
 
अमेरिकेच्या आयात शुल्क वाढीचे परिणाम शेअर बाजारावर तसेच सोन्यावर झाले. सोने लाखाचा टप्पा पार करणार असल्याची शक्यता  व्यक्त केली जात होती. मात्र सोन्याच्या दरात घसरण सुरु झाली होती. सोने ५५  हजार रुपये तोळा होणार या अफवेने ग्राहकांनी दागिने विकायला सुरुवात केली. सराफा पेढ्यांवर सोने विकणारे ग्राहक जास्त दिसू लागले होते. ट्रम्प यांनी वाढीव आयात शुल्काबाबतचा निर्णय ९० दिवसांनी घेतला जाईल, असे सांगितले आणि सोन्याचे दर वाढले. 
गुंतवणूक चांगला नफा देणारी सोने खरेदीतील गुंतवणूक आतापर्यंत कायम चांगला नफा देणारी ठरली आहे. यावेळी सोन्याच्या भावात होणारी चढ उतार ग्राहकांच्या पथ्यावर पडणार आहे, असे सांगितले जात आहे.  पण दर ५५ हजार रुपयांपर्यंत घसरण्याचा अंदाज खरा ठरणार की  खोटा? याबाबत उत्सुकता आहे. पप  
 
मध्यंतरी सोन्याचे दर का घसरले?
 
• सोन्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले
• ऑस्ट्रेलियानेही सोन्याचे उत्पादन वाढवले
• रिसायकल सोन्याचा पुरवठा  वाढला
• केंद्रीय बँकांकडून १ हजार ४५ टन सोने खरेदी
• ७१ केंद्रीय बँका सोने साठा कमी करु शकतात.
• घसरणीच्या भीतीनं सोने मोडीत काढण्याची घाई
• अफवेमुळे ग्राहकांकडून विक्री

(‘गुंतवणूक मित्र’ पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या लेखांमधील मते त्या त्या तज्ज्ञांची आहेत. गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा निर्णय आपल्या जबाबदारीवर घ्यावा.)

Related Articles